नागावमध्ये शिरलेला बिबट्या पुन्हा फणसाडमध्ये? pudhari photo
रायगड

Leopard spotted in Nagav : नागावमध्ये शिरलेला बिबट्या पुन्हा फणसाडमध्ये?

पोलीस, वनविभागाकडून शोध सुरूच

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग ः नागाव,ता.अलिबाग येथे मुक्तपणे संचार करणाऱ्या बिबट्याचा माग काढण्यात वनखात्याला यश आलेले नाही. मात्र, तो आलेल्या मार्गानेच पुन्हा फणसाडकडे परतला असावा, अशी शक्यता वनविभागासह नागाव ग्रामपंचायतीने केलेली आहे. तरीही नागरिकांनीह सावधगिरीने रहावे, योग्य ती खबरदारी घ्यावी,असेआवाहन यंत्रणेने केलेले आहे.

मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता नागाव येथे एका वाडीत बिबट्या शिरला होता त्यानंतर संपूर्ण दिवस, रात्र त्याचा शोध घेण्यात आला. रोहा, पुणे, येथून वनखात्याची फौज नागावमध्ये दाखल झाली. गावकरी, तसेच उत्सुकतेपोटी मोठ्यासंख्येने ग्रामस्थही नागावमध्ये बिबट्याच्या कुतुहलाने दाखल झाले.

बिबट्या अधूनमधून दृष्टीस पडायचा. त्यामुळे एकच कल्ला व्हायचा. बिबट्या बिथरून जायचा. या दरम्यान त्याने 6 जणांना जखमी केले. त्याला जेरबंद करण्यासाठी केलेले सारे प्रयत्न वाया गेले. तो त्याचा नैसर्गिक अधिवास सोडून मानवी वस्तीत आल्याने बावरला होता.

गर्दी,गोंगाट यात त्याला पुन्हा बाहेर पडणे शक्य झाले नाही. असे सांगण्यात येते.त्याचा वन,पोलीस तसेच ग्रामस्थांच्यावतीने सलग शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.मात्र तो कुणालाही आढळला नाही.त्यामुळे तो ज्या खाडी मार्गे नागावमध्ये घुसला होता त्याच मार्गे तो फणसाडला माघारी वळला असावा,अशी शक्यता वनविभागातर्फे करण्यात आली आहे.मात्र,त्याचाअधिकृत दुजोरा कुणीही दिलेला नाही.

कोप्रोली-पुनाडे परिसरातील जंगलात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे आदिवासींचे म्हणणे आहे. या भागात बिबट्याच्या पायाचे ठसे तसेच शिकार केलेल्या बकऱ्या आणि कुत्र्यांचे अर्धवट खालेले मृतदेह आढळले आहेत.त्यामुळे शेतकरी, रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या घटने संदर्भात उरण वन क्षेत्र पाल अधिकारी नथूराम कोकरे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की या परिसरात आढळलेल्या ठश्यांवरून सदर जंगल परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा अंदाज आहे. वनविभागाची टीम या ठिकाणी पाठविण्यात आली असून बिबट्या असल्याची खात्री करण्यात येत आहे.

सोशल मीडियावर चर्चेला उत

गेल्या दोन दिवसांपासून बिबट्या हा एकच विषय अलिबाग मध्ये चर्चेचा झाला आहे. व्हायरल मेसेज, व्हिडिओ यातून निर्माण होणारी भीती, वाढली आहे . विशेष म्हणजे दिवसभरात तो बिबट्या नागाव व्यतिरिक्त परिसरातील गावांमध्ये दिसला...असे ऐकावयास मिळत होते. वास्तवात तो नेमका कुठे आहे ,याचा शोध लागला नव्हता. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी देखील तो नागावच्या बाहेर गेला, की नाही याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. बिबट्या जेरबंद झाला नाही, पण भीती, दहशद मात्र कायम राहिली!

पुनाडेत बिबट्याने बकऱ्या, कुत्रे केले फस्त

उरण ः उरण तालुक्यातील कोप्रोली,पुनाडे मधिल डोंगर परिसरातील आदिवासी वस्तीत मंगळवारी (दि9) रात्रीच्या अंधारात बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर बिबट्यांनी दोन बकऱ्या ,दोन कुत्रे खाऊन टाकली आहेत. सदर बिबट्या शिरल्याच्या बातमीने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग, स्थानिक नागरिकांनी आठ तासांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप बिबट्याला जेरबंद करण्यात आलेले नाही.त्यामुळे बिबट्या आलारे आला तरी उरणकरांनो सावधान अशी परिस्थिती उरण तालुक्यात निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT