सावित्री नदीवरील बंधाऱ्यातून तरूण वाहून गेल्यानंतर शोधमोहीम सुरू, नागरिकांनी पुलावर गर्दी केली होती.  (Pudhari Photo)
रायगड

Poladpur News | लोहारे तुर्भे येथील सावित्री नदीत 'एल अँड टी' कंपनीचा कंत्राटी कर्मचारी बेपत्ता; शोधकार्यावेळी रेस्क्यू टीमची बोट उलटली

Raigad News | बुधवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार

पुढारी वृत्तसेवा

Raigad Lohare Turbhe Incident L&T Worker Missing

पोलादपूर : लोहारे तुर्भे (ता.पोलादपूर) येथील सावित्री नदीवरील कोल्हापूर बंधाऱ्यात पोहणाऱ्या तीन तरुणांपैकी एक तरुण अचानक पाण्याच्या प्रवाहात ओढला गेला आणि तो बेपत्ता झाला. ही घटना आज (दि.२३) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. नरवीर, काळभैरवनाथ व साळुंखे रेस्क्यू टीम यांच्यासह आपदा मित्र यांनी बेपत्ता तरुणाचा सायंकाळपर्यंत शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. दरम्यान, तरुणाचा शोध घेताना पाण्याच्या प्रचंड प्रवाहात रेस्क्यू टीमची नौका पलटल्याने उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.

याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर वाहिनी सावित्री नदीच्या पात्रावर बांधण्यात आलेल्या पुलालगतच्या केटी बंधाऱ्याच्या जवळील कातळाजवळ लार्सन अँड टूब्रो कंपनीचे तिघे कंत्राटी कामगार पोहण्यासाठी उतरले होते. यावेळी पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने एक तरुण पाण्यात ओढला गेला. तो गटांगळ्या खात काही अंतरापर्यंत जात असताना बेपत्ता झाला.

या घटनेनंतर अपदा मित्र किरण पार्टे व संतोष मोरे आणि काळभैरवनाथ रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर, दिनेश दरेकर, लक्ष्मण कळंबे, उमेश पालकर, दीपक उतेकर, अरुण मोहिते, नरवीर रेस्क्यू टीमचे रामदास कळंबे, साळुंखे रेस्क्यू प्रशांत साळूंके, नयन ठाकूर, धैर्यशील भोसले, पार्थ बुटाला तसेच सीस्केप महाडचे प्रेमसागर मेस्त्री आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलादपूर पोलीस ठाण्याचे पीएसआय पवार आणि पोलीस कर्मचारी तसेच तहसील कार्यालयाचे कर्मचारी यांनी उपस्थित राहून शोधकार्यामध्ये सहभाग घेतला.

यावेळी रिव्हर राफ्टिंग साठी टाकण्यात येणारी नौका गेली असता ते अचानक कलंडली आणि रेस्क्यू टीम मधील सदस्य पाण्याच्या प्रवाहात कोसळले. यामुळे सर्वांच्या काळजाचा ठेका चुकला. सर्व रेस्क्यू टीम सदस्य शिताफीने प्रवाहापासून दूर झाले. त्यामुळे सर्वच जण नदीच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकले. या बचाव कार्यादरम्यान वाहून गेलेल्या तरुणाचा दिवसभरात तपास लागू शकला नाही त्यामुळे सायंकाळी उशिरा शोध कार्य थांबविण्यात आले.

पीएसआय पवार यांनी बेपत्ता तरुण जोगेश सुरेन ओरन (वय २१) हा लार्सन अँड टुब्रो कंपनीतील कंत्राटी कामगार असल्याची माहिती दिली. रात्री पाण्याचा प्रवाहावर लक्ष ठेवून वाहून गेलेल्या तरुणाचा शोध जारी ठेवण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT