

वाई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडाळाडून सुरूर, वाई ते पोलादपूर या रस्त्याचे काम करण्यात येत आहे. या रस्त्यासाठी 293 कोटींचा निधी शासनाने मंजूर केले आहे. या रस्त्यावर ब्रिटीशकालीन 100 वर्षांहून अधिक जुनी असणारी वडाची झाडे ठेकेदार समीर रहाट यांच्याकडून तोडली आहेत. या मार्गावरील हजारो झाडांची कत्तल केली जाणार आहे. नागरिक व अधिकार्यांकडून याला विरोध असतानाही रेटून झाडे तोडल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनीच संबंधित ठेकेदाराला कडक समज देण्याची गरज निर्माण झाली आहे.
सुरूर-वाई-पोलादपूर रस्त्यासाठी 293 कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे. हा निधी देत असताना रस्त्यावरील कोणत्याही झाडाला गरज नसल्यास पाडण्यात येवू नये, असे आदेश आहे. तरीही या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.
वाई-सुरूर रस्त्याच्या महामार्गाचे काम युद्धपातळीवर चालू आहे. या रस्त्याच्या कामात शेकडो वर्षांची ब्रिटिशकालीन झाडे विकासाच्या नावाखाली जमीनदोस्त होणार आहेत. त्यामुळे वाईतील अनेक संघटनांनी रस्ते महामंडळाच्या विरोधात कंबर कसली असून या महामार्गाचे चुकीच्या पद्धतीने चाललेल्या कामाला विरोध करण्यासाठी या संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. ही झाडे तोडू नयेत, यासाठी सज्जड दम देवूनही संबंधीत ठेकेदाराने झाडे तोडण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे.
वाई -सुरूर रस्त्यावरील वडाची भलीमोठी झाडे ही या भागाची ओळख आहेत. ही ओळख पुसण्याचे पाप ठेकेदार समीर रहाट यांच्याकडून केले जात आहे. रस्ते कामात बर्याच वेळा तोडणार्या झाडांचे पुनर्वसन करण्याचे फक्त आश्वासन दिले जाते. परंतु त्याची अंमलबजावणी मात्र शून्य होते. या कामातही तशीच भीती व्यक्त करण्यात येत आहे. अधिकार्यांनी याबाबत ठेकेदाराला नोटीसा बजावूनही त्याला कोलदांडा दिला जात आहे.
सुरूर-वाई या रस्त्यावरील झाडांच्या पुनर्वसनाच्या बाबतीत कोणताही निर्णय न घेताच झाडे तोडण्यास सुरुवात झाली आहे. कोणत्याही विभागाची परवानगी नसताना महामार्गाचे काम करणारा ठेकेदार कोणाचीही तमा न बाळगता झाडाच्या मुळावर घाव घालत आहे. या मार्गावर पसरणी घाटातही मोठ्या प्रमाणात रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यावेळी आराखड्यात असणार्या झाडांव्यतिरिक्त जास्त झाडांची कत्तल होणार आहे. यासाठी रस्ते विकास महांमडळाने ठेकेदाराला समज देणे आवश्यक आहे.