Konkan Traditional Tools Pudhari
रायगड

Konkan Traditional Tools: जात्याचा घरघर आवाज, पाटा-वरवंटा अन् अंगणातली चूल... कोकणच्या जुन्या घरांची आठवण आजही ताजी!

कामांना वेळ, श्रम लागायचे; मात्र या श्रमांमधूनच शरीराची सतत हालचाल

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर: पूर्वीचा काळ आठवला की मन नकळत जुन्या आठवणींच्या गावात जाऊन पोहोचते. मातीची घरं, अंगणातली चूल, पहाटेपासून सुरू होणारी लगबग, शेतातील कामं आणि घराघरांत ऐकू येणारा जात्याचा घरघर आवाज या सगळ्यात एक वेगळंच जग दडलं होतं. म्हणूनच कदाचित म्हटलं जातं, ‘जुनं ते सोनं’.

कोकणातील गावांमध्ये पूर्वी घराघरांत जातं, पाटा-वरवंटा, उखळ-मुसळ आणि व्हायन यांसारखी पारंपरिक साधनं असायची.

दळण दळायचं असेल तर जात्यावर बसावं लागायचं. चटणी वाटायची असेल तर पाटा-वरवंटा वापरावा लागायचा. भात किंवा धान्य कांडायचं असेल तर उखळ-मुसळाची साथ असायची. या कामांना वेळ आणि श्रम लागायचे; मात्र या श्रमांमधूनच शरीराची सतत हालचाल होत असे.

पहाटे उठल्यापासून माणूस कामात गुंतलेला असायचा. घरातील कामं, शेती, गुराढोरं, लाकूडफाटा, पाणी भरणं, धान्याची कामं अशा विविध कामांमुळे दिवसभर शरीराला काम मिळायचं. घाम गाळून केलेल्या श्रमांमुळे शरीरही झिजायचं आणि मनालाही समाधान मिळायचं.

आधुनिक युगात मशीनने घेतली पारंपरिक साधनांची जागा

आज काळ बदलला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे माणसाचं जीवन अत्यंत सोपं झालं आहे. पूर्वी तासन्‌तास लागणारं काम आता काही मिनिटांत होतं. गावाकडेही जुन्या जात्या-व्हायनची जागा आधुनिक मशीनने घेतली आहे. वीज लावली की दळण तयार, चटणी तयार आणि धान्याची कामंही झटपट होतात.

यामुळे श्रम वाचले, वेळ वाचला आणि कामही वेगाने होऊ लागलं. मात्र काम सोपं होत असताना शरीराचं कामही कमी झालं. वेळ वाचला, पण त्या वेळेत शारीरिक हालचाल कमी झाली.

तंत्रज्ञानामुळे दूरचा माणूस क्षणात जवळ आला आणि जग अक्षरशः हाताच्या तळव्यावर आलं. मात्र त्याच वेळी चालणं, श्रम करणं आणि स्वतःच्या हाताने काम करणं कमी झालं.

आधुनिक जीवनशैलीत शारीरिक हालचाल कमी होत असल्याने आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आज व्यायाम आणि नियमित शारीरिक हालचालींचं महत्त्व पुन्हा अधोरेखित होत आहे.

पूर्वी माणूसच होता ‘मशीन’

पूर्वीच्या काळात प्रत्येक कामासाठी मशीन नव्हती; माणूसच मशीन होता. जातं फिरवताना हातांची ताकद वापरली जायची, मुसळ उचलताना शरीराची ताकद लागत होती आणि शेतात काम करताना घाम फुटायचा. आज मशीनने हे सारे श्रम आपल्या वाट्याने उचलले आहेत. म्हणून तंत्रज्ञान वाईट आहे असं नाही.

उलट तंत्रज्ञानाने माणसाचं जीवन अधिक सुलभ केलं आहे. प्रश्न एवढाच आहे की, सोयी वाढताना आपण आपल्या शरीराची मेहनत पूर्णपणे विसरू नये. जुनं जातं आता घरात नसेल, व्हायन वापरात नसेल, पाटा-वरवंट्याची जागा आधुनिक उपकरणांनी घेतली असेल; पण त्या जुन्या साधनांनी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवली-श्रम ही केवळ गरज नव्हती, तर ती एक जीवनशैली होती.

आज मशीन दळण दळते; पण माणसाने स्वतःला घडवण्यासाठी पुन्हा थोडं ‘दळणं’ गरजेचं आहे-व्यायामाचं, श्रमाचं आणि घामाचं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT