Raigad October Heat pudhari photo
रायगड

Raigad October Heat : ऑक्टोबर हीटचा तडाखा,हवामान बदलाचे संकट

कोकणातील शेती, पाणी,जनजीवनावर परिणांमाची शक्यता; ज्येष्ठ कृषी अभ्यासक डॉ. विवेक भिड

पुढारी वृत्तसेवा

रायगड : मान्सूनच्या परताव्यानंतर उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच कोकण किनारपट्टीवर यंदा 'ऑक्टोबर हीट'चा तीव्र प्रभाव जाणवत आहे. समुद्रावरून येणारे आर्द्र वारे आणि आकाशातील निरभ्र वातावरणामुळे वाढणाऱ्या तापमानाचा फटका कोकणातील जनजीवन, शेती आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेला बसत आहे. कोकणातील शेती, बागायती, पाणी आणि जनजीवनावर याच्या विपरित परिणांमाची शक्यता असल्याचे अनुमान ज्येष्ठ कृषी अभ्यासक डॉ. विवेक भिड यांनी व्यक्त केले आहे.

शेती आणि बागायती पिकांवर वाढता ताण

ऑक्टोबर महिन्यात कोकणातील प्रमुख पीक असलेला भात कापणीच्या आणि दाणे भरण्याच्या टप्प्यात असतो. तीव्र उन्हामुळे शेतजमीन वेगाने वाळत असल्याने दाणे बारीक राहणे किंवा पोकळ पडण्याचे प्रमाण वाढले आहे. कापणी केलेला भात वाळवताना दाणे गळून पडत आहेत. दुसऱ्या बाजूला वाढत्या तापमानामुळे हापूस आंबा आणि काजूच्या झाडांना वेळेआधीच व विषम प्रमाणात मोहर येत असून मातीतील ओलावा कमी झाल्याने झाडांना पाण्याचा ताण बसत आहे. यामुळे लहान फळे गळणे व किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जलस्रोत आटल्याने पाणीटंचाईचे सावट

पावसाळा नुकताच संपला असला तरी वाढत्या तापमानामुळे विहिरी, कूपनलिका, लहान नद्या आणि ओढ्यांमधील पाणी वेगाने आटत आहे. किनारपट्टीवर हवेतील आर्द्रता ८० ते ९० टक्क्यांच्या दरम्यान असल्यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा 'हीट इंडेक्स' ५ ते ७ अंश सेल्सिअसने जास्त जाणवत आहे. परिणामी पाण्याचे बाष्पीभवन दुप्पट वेगाने होत असून येत्या काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्ह दिसत आहेत.

दैनंदिन कामकाजावर परिणाम

अतिउष्णता आणि सततच्या घामामुळे डिहायड्रेशन, उष्माघात, घामोळ्या व त्वचेच्या आजारांत मोठी वाढ झाली आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत तीव्र ऊन असल्यामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. याचा थेट परिणाम दैनंदिन व्यवहारांवर झाला असून शेतमजूर, बांधकाम कामगार आणि फेरीवाल्यांना आपल्या कामाच्या वेळा सकाळी लवकर किंवा संध्याकाळी शिफ्ट कराव्या लागत आहेत.

समुद्राचे वाढते तापमान आणि मत्स्य उद्योगा समोरील अडचणी

समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्याने मासे खोल पाण्यात निघून गेले आहेत, ज्यामुळे पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्यात पुरेसे मासे लागत नाहीत. पकडलेले मासे ताजे ठेवण्यासाठी बर्फाचा वापर वाढल्याने डिझेल आणि बर्फावरील खर्च वाढला आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे पर्यटकांची पावले मंदावली असून पंखे, कुलर आणि एसीच्या प्रचंड वापरामुळे विजेची मागणी वाढून भारनियमनाचा सामना करावा लागत आहे.

हवामान बदलाचे अनपेक्षित संकट

हवामानातील या विक्रमी बदलांवर चिंता व्यक्त करताना डॉ. विवेक भिडे यांनी स्पष्ट केले की, सध्या हवामानात झालेला बदल अत्यंत गंभीर असून ऑक्टोबर हीटमुळे तापमान अनपेक्षितपणे वाढले आहे.

या वाढलेल्या तापमानाचा कोकणातील एकूण हवामानावर आणि विशेषतः पिण्याच्या पाण्याच्या साठ्यावर नेमका काय परिणाम होईल याबद्दल अनिश्चितता आहे. पावसाचे प्रमाण आणि अनियमितता यावरच आंब्याचे भवितव्य अवलंबून असल्याने यंदाच्या उत्पादनाबाबत आत्ताच सांगणे कठीण आहे. थंडी आणि मान्सूनचे चक्र बदलल्याने नोव्हेंबरच्या सुमारास शेतीची कामे किंवा भात कापणीचे नियोजन करावे लागत आहे.

शासकीय मदतीतील त्रुटी आणि शेतकऱ्यांची हेळसांड

भातशेतीच्या नुकसानावर भाष्य करताना डॉ. भिडे यांनी सांगितले की, आधीच अवकाळी पावसामुळे भात पिकावर विपरीत परिणाम झाला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा स्थितीत शासनाचे पंचनामे आणि मिळणारी मदत केवळ कागदोपत्री व प्रशासकीय प्रक्रियेपुरतीच मर्यादित राहते. शेतकऱ्यांना मिळणारी मदत अत्यंत तुटपुंजी असल्याने त्यांची मोठी हेळसांड होत आहे.

विशेषतः रायगड जिल्ह्यात पिकांचे अतोनात नुकसान होऊनही योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावत चालली आहे.या तीव्र उष्णतेच्या काळात नागरिकांनी जास्तीत जास्त पाणी पिणे आणि दुपारच्या वेळी थेट उन्हात जाणे टाळणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांनी पिकांना व फळबागांना पाण्याचा ताण पडू नये म्हणून संध्याकाळच्या किंवा पहाटेच्या वेळी ठिबक सिंचनाचा वापर करून हलके पाणी देणे अत्यंत आवश्यक ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT