Konkan Monsoon Rainfall Pudhari
रायगड

Konkan Monsoon Rainfall:कोकण विभागात मान्सूनचा संमिश्र प्रवास; ९६.१ टक्के पावसाची नोंद

ठाण्यात सरासरीपेक्षा ६.७ टक्के अधिक पाऊस; अंबरनाथमध्ये सर्वाधिक १२९.५ टक्के पावसाची नोंद

पुढारी वृत्तसेवा

रायगड: यंदाच्या मान्सून हंगामात कोकण विभागात पावसाचे संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. मान्सूनच्या आकडेवारीनुसार रायगड, ठाणे आणि पालघर या उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार घोडदौड करत गतवर्षीच्या तुलनेत अधिक पावसाची नोंद केली आहे.

दुसरीकडे दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मात्र यंदा पावसाने काहीशी पाठ फिरवल्याने गतवर्षाच्या तुलनेत तूट निर्माण झाली आहे. संपूर्ण कोकण विभागाचा विचार करता विभागात २,५८०.२ मिमी या सरासरीच्या तुलनेत २,४७९.५ मिमी म्हणजेच ९६.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात अपेक्षित २,१७४.३ मिमी सरासरीच्या तुलनेत तब्बल २,३२०.१ मिमी म्हणजेच १०६.७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी या काळात २,१८७.९ मिमी (१००.६ टक्के) पाऊस झाला होता. यामध्ये अंबरनाथ तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच १२९.५ टक्के (२,२५३.२ मिमी) पाऊस झाला. त्यापाठोपाठ उल्हासनगर (१२३.० टक्के),

रायगडमध्ये १२.५ टक्के अधिक पाऊस

रायगड जिल्ह्यात २२ सप्टेंबर २०२६ पर्यंत २८७१.२ मिमी म्हणजेच सरासरीच्या ९४.५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच काळात २४९३.२ मिमी (८२.० टक्के) पाऊस झाला होता, म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल १२.५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पाहता उरण तालुक्याने सर्वाधिक १३९.२ टक्के (२७३४.० मिमी) पावसासह प्रथम क्रमांक पटकावला आहे.

अलिबाग (११५.५ टक्के), पनवेल (११०.५ टक्के), माणगाव (१०५.९ टक्के), महाड (१०२.७ टक्के) आणि खालापूर (१००.३ टक्के) या तालुक्यांनी सरासरीची शंभरी ओलांडली आहे, तर श्रीवर्धन (८२.० टक्के) आणि म्हसळा (८२.९ टक्के) हे तालुके वगळता उर्वरित संपूर्ण जिल्ह्यात चित्र समाधानकारक आहे.

मुरबाड (११५.० टक्के), भिवंडी (१०९.२ टक्के), ठाणे (१०९.० टक्के) आणि शहापूर (१०५.१ टक्के) येथे मुसळधार पावसाची नोंद झाली, तर कल्याण तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ९६.२ टक्के पाऊस झाला आहे.पालघर जिल्ह्यात यंदा १०१ टक्के पावसाची नोंद झाली असून गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे, ज्यामुळे या भागातील शेतीला आणि जलप्रकल्पांना दिलासा मिळाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ७६.४५ टक्के पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात १ जून ते ९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत २३,१४८.४६ मिमी म्हणजे ७६.४५ टक्के पाऊस पडला आहे. गतवर्षी याच कालावधीत ३०,४५१.०६ मिमी (१००.५७ टक्के) पाऊस झाला होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसात सुमारे २४ टक्क्यांनी घट झाली आहे.

तालुकानिहाय विचार करता खेड तालुक्यात सर्वाधिक ९१.८४ टक्के पाऊस झाला असून चिपळूण (८८.०७ टक्के) आणि गुहागर (८६.८४ टक्के) त्यानंतर येतात. संगमेश्वर तालुक्यात जिल्ह्यात सर्वात कमी ६५.९१ टक्के पाऊस नोंदवला गेला असून राजापूर (६७.८७ टक्के) व लांजा (६९.५६ टक्के) या तालुक्यांतही तूट कायम आहे.

सिंधुदूर्गात पावसाची तूट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही रत्नागिरीप्रमाणेच गतवर्षीच्या सरासरीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाला असल्याचे दिसून येत आहे. उत्तर कोकणात झालेल्या समाधानकारक पावसामुळे भातशेती आणि जलसाठ्यांच्या दृष्टीने मान्सून दिलासादायक ठरला आहे, तर दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये २५ ते ३४ टक्क्यांची तूट असल्याने उर्वरित कालावधीत पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT