रायगड: अलिबाग विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी-जुवेकर यांनी बंडखोरी करुन विधान परिषदेच्या कोकण मतदार संघासाठी शनिवारी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. परिणामी महायुतीमधील शिवसेना व तटकरेंमधील खदखद पून्हा एकदा स्पष्टपणे समोर आली आहे.
दरम्यान महायूतीचे अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याचे मानले जात आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठाचे माजी आमदार बाळ माने यांची उमेदवारी जाहिर झाल्याने आता या मतदार संघात तिरंगी लढत होणार असे चित्र आहे.
विधान परिषदेचा कोकण मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे असल्याने अनिकेत तटकरेंना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. परंतु शिवसेना त्यांचे काम करणार की नाही आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या शिलेदारांना काय आदेश देतात याकडेही शिवसेना पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले यांचे पुत्र व रायगड जि.प.सदस्य विकास गोगावले यांच्याकरिता देखील उमेदवारी मागण्यात आली होती. मात्र ते अर्ज भरणार नाहीत अशी माहिती शिवसेना गोटातून प्राप्त झाली आहे.1 जून ही विधान परिषदेच्या कोकण मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
अनिकेत तटकरेंचा प्रचार करणार नाही : जुवेकर
आपण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे जुईली दळवी-जुवेकर यांनी सांगितले. पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. या मतदार संघात शिवसेनेची ताकद जास्त आहे. विकास गोगावले उभे राहणार असतील तरी आम्ही विचार करु, असे सांगतानाच तटकरे यांच्या नावाला आमचा विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीने कायमच शिवसेनेवर रायगडमध्ये अन्याय केला असल्याचेही त्यांनी सांगितले. महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. अनिकेत तटकरेंचा प्रचार करणार नसल्याचेही त्यांनी जुईली दळवी-जुवेकर यांनी स्पष्ट केले.