जयंत धुळप
रायगड: अमेरिका आणि युरोपच्या सीमेवर वसलेल्या आईसलँड देशाची राजधानी रेकजाविकमधील भारतीय दूतावासाने कृषी व प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण अर्थात ‘अपेडा’ यांच्या सहकार्याने २४ जून रोजी आईसलँडची राजधानी रेकजाविक येथे, तर २५ जून २०२६ रोजी उत्तर आईसलँडमधील अकुरेरी येथे भारतीय आंब्याच्या प्रचार कार्यक्रमांचे आयोजन केले.
यातून भारतीय आंब्यांच्या समृद्ध वैविध्यतेची व आयात क्षमतेची झलक दिसून आली. आईसलँडमध्ये आयोजित केलेला अशाप्रकारचा हा पहिलाच आंबा प्रचार कार्यक्रम होता.
भारतीय दूतावासातील द्वितीय सचिव निशा तोमर यांनी भारताच्या आंबा उत्पादनावर एक सादरीकरण केले, ज्यामध्ये भारत हा जगातील सर्वात मोठा आंबा उत्पादक देश असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात भारताची शान आणि जागतिक स्तरावर प्रचंड मागणी असलेला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीचा 'हापूस' (अल्फान्साे) आंबा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. आपल्या अद्वितीय सुवास, केशरी गर आणि अप्रतिम चवीसाठी जगभर ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्याला आइसलँडच्या बाजारपेठेत संधी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
हापूसच्या निर्यातीवर भर
आइसलँडमधील भारतीय राजदूत आर. रवींद्र यांनी भारतातील जगप्रसिद्ध आंब्यांच्या विविध प्रकारांची वैशिष्ट्ये सांगितली. त्यांनी आइसलँडमध्ये भारतीय आंब्याच्या निर्यातीला, विशेषतः कोकणच्या हापूस आणि इतर प्रीमियम वाणांना प्रोत्साहन देण्याच्या संधींवर विशेष भर दिला.
आंतरराष्ट्रीय पाहुण्यांनी चाखली कोकणच्या राजाची चव
या उपक्रमाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. यामुळे आयातदार, राजनयिक मंडळाचे सदस्य, आइसलँडमधील व्यवसायांचे प्रतिनिधी व आइसलँडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अधिकारी एकाच व्यासपीठावर एकत्र आले.
उपस्थित अतिथींना भारतातील कोकणचा हापूस, दशहरी, चौसा, लंगडा व केसर या आपल्या विशेष सुगंध, विलक्षण चव तसेच गुणवत्तेमुळे सर्वत्र सुप्रसिद्ध असलेल्या आंब्यांचा आस्वाद घेता आला.