माणगाव : कमलाकर होवाळ
यंदा बदलत्या हवामानामुळे कोकणातील आंबा व काजू या फळ पिकांना मोठा फटका बसत आहे. थोडेफार आलेल्या या फळ पिकांवरही मोठे विघ्न आले आहे. यातून आंबा कसाबसा विघ्नातून सावरलाच तर त्या आंब्याची यंदा खवय्यांना चव उशिरा चाखायला मिळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे यंदा ‘कोकणच्या राजा’ची गाडी लेटच येणार अशी माहिती आंबा बागायतदारांकडून देण्यात येत आहे.
कोकणाला निसर्गाचे वरदान लाभले असून येथे विविध फळांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामध्ये फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंब्याला देशभरासह परदेशातूनही मोठी मागणी असते. बाजारात येणारा पहिला आंबा कोण खाणार यासाठी गरीबांपासून श्रीमंतां पर्यंत चढाओढ असते. काही धनाढ्य ग्राहक तर पहिल्या आंब्याच्या पेटीसाठी मुंबई-पुणे बाजारपेठेत लिलावासाठी आधीच हजेरी लावून बसलेले असतात.
काही बागांमध्ये तर यंदा आंबा फळाचे प्रमाण कमी असले तरी अलीकडील ढगाळ वातावरण व तापमानातील चढउतारामुळे आंबा पिकावर मोठे संकट आले आहे. त्यामुळे यंदाही ‘कोकणच्या राजाची गाडीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. असे चित्र दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होत असून त्याचा परिणाम आंब्याच्या मोहरावर झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी जोरदार थंडी पडल्यामुळे अनेक ठिकाणी मोहोर उशिरा आला. जानेवारी अखेरपर्यंत मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन व अलिबाग वगळता रायगड जिल्ह्यात केवळ मोहोर मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. त्यामुळे सर्वांनाच यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादन होईल व चाखता येईल ही आशा होती. यंदा पाऊस उशिरा थांबला, थंडी उशिरा सुरू झाली आणि मध्येच तापमान वाढले. या हवामानातील चढउतारामुळे डिसेंबरमध्ये यायला हवा असलेला मोहोर उशिरा आला. जानेवारीच्या सुरुवातीला थंडीचे वातावरण होते; मात्र त्यानंतर अचानक तापमान वाढल्याने मोहरावर परिणाम झाला. या बदलामुळे शेतकरी व बागायतदारां मध्ये चिंता निर्माण झाली आहे.
र्षभर आंबा बागेची काळजी घेणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा चांगले उत्पादन मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र हवामानातील बदलामुळे उत्पादनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून 90 टक्के आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. उर्वरित पाच ते दहा टक्के असणाऱ्या आंबा व काजू पिकाला अचानक तापमान वाढल्याने फटका बसला आहे. तर अवकाळी वादळी पावसाच्या भीतीचेही बागायतदारांवर संकट घोंघावत आहे. मोहोर आल्यानंतर फळ पक्व होण्यासाठी साधारणतः 90 दिवस लागतात. यंदा मोहोर उशिरा आल्याने रायगड जिल्ह्यात आंबा किमान 25 ते 30 दिवस उशिरा बाजारात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रायगड जिल्ह्यात सुमारे 11 हजार 612 हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड असून उत्पादनक्षम क्षेत्र सुमारे 9 हजार हेक्टर आहे. सध्या अनेक ठिकाणी केवळ 5 ते 10 टक्केच मोहोर दिसून येत आहे. त्यातच तुडतुडे व भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने काही भागातील मोहोराचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा आंबा उत्पादन कितपत होईल याबाबत बागायतदारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आंबा व काजू या फळपीकाकडे कोकणातील बागायतदार याकडे नगदी पीक म्हणून पाहतो. या पिकावर त्याचे संपूर्ण कुटुंब अवलंबून असते. ‘निसर्गाच्या अवकृपेने यंदा कोकणातील आंबा - काजू बागायतदार पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. वर्षभराची आशा असलेले फळपीक हातातून निसटले आहे. केलेल्या मशागती आणि फवारणीचाही खर्च निघणे कठीण झाले आहे. ‘बदलत्या हवामानामुळे रायगडातील आंबा-काजू बागायतींना मोठा फटका बसला असून यंदा उत्पादन केवळ 5 ते 10 टक्क्यांवर आले आहे. शेतकरी - बागायतदार पुरता मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून सरसकट किमान पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करावी.पंकज तांबे, शेतकरी नेते, रायगड