खोपोली (रायगड): खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदार कुणाच्या गळ्यात विजयाची माळ घालतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. कमालीची चुरस आणि ईर्षा शहरात सर्वत्र पहावयास मिळत आहे. खोपोली नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष व भाजपा विरुद्ध शिवसेना (शिंदे) पक्ष अशी लढत होत आहे. येथे राष्ट्रवादीचे सुनील पाटील आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे कुलदिप शेंडे यांच्यात खरी लढत होणार आहे. अन्य सात अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. नगरसेवक पदाच्या ३१ जागांकरिता १५४ उमेदवार रिंगणात आहेत.
मुंबई-पुणे महामार्गावरील एक महत्वाचे शहर म्हणून खोपोलीकडे जाते. कधीकाळी पाहिले औद्योगिकीकरणामुळे खोपोली नगरपालिका ही महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत नगरपालिका म्हणून ओळखली जात असे. पण दुर्दैवाने विविध कारणांमुळे औद्योगिक कारखानदारीला उतरती कळा लागली आणि शहराचे वैभव रसातळाला गेले. आता शहरात
विविध मुलभूत गरजांची मोठी वानवा आहे. वाढत्या नागरीकरणाने शहराचा व्यापही वाढत चालला आहे. अशावेळी मूलभूत गरजा पुरविण्यात नगरपालिका कमी पडत असल्याचे जाणवते. राजकीय अस्थिरतेने येथील विकासकामांवरही परिणाम होत आहे. शहराच्या सर्वांगिण विकासाला चालना देण्यासाठी सक्षम नेतृत्व शहरवासियांना हवे यासाठी येणारी ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाची वाटत आहे.
राज्यातील सत्तधारी असणारे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी तुल्यबळ लढत होत आहे. यामधून कोण जिंकणार हे येत्या ३ डिसेंबरला समजणार आहे. राष्ट्रवादीने खोपोलीसाठी जोरदार मोर्चेबांधणीही केलेली आहे. त्याकडे लक्ष लागले आहे.