पनवेल: मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खारपाडा टोलनाक्यावर रविवारी रात्री टोल भरण्यावरून झालेल्या वादाचा सामना करावा लागला. टोल नाक्यावरील कर्मचारी आणि ट्रॅव्हल्स बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली.
या वेळी लाठी-काठ्यांसह लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगितले जात असून, संबंधित ट्रॅव्हल्स बसची तोडफोड केल्याचीही माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टोल भरण्यावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. ‘आम्ही टोल भरणार नाही, टोल कसला?’ या कारणावरून प्रवासी आणि टोल कर्मचारी यांच्यात वाद सुरू झाला.
या वादातून दोन्ही गटांमध्ये प्रथम धक्काबुक्की झाली आणि पुढे जावून त्यांचे रुपांतर मारामारीत झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेमुळे टोलनाक्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या हाणामारीच्या प्रकारामुळे मुंबईहून गोव्याकडे आणि गोव्याकडून मुंबईस जाणाऱ्या दोन्ही मार्गीकेवर मोठी वाहतूक कोंडी देखील झाली होती.
मुंबईकडे प्रवास करणारी खाजगी ट्रॅव्हल्स खारपाडा टोल नाक्यावर आली, या वेळी आम्ही टोल भरणार नाही टोल कसला यावरून कर्मचारी आणि बस मधील प्रवाशांनामध्ये बाचाबाची झाली, आणि इथेच भांडणाची ठिणगी पडली आणि थेट लाठी काठी, खुर्चीने मारहाण करण्यात आली.
बघता बघता तुफान राडा सुरू आला त्या मुळे काही काळ टोल नाका जाम झाला. हाणामारीची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटना स्थळी पोचून वाद मिटविला. आणि वाहतूक पूर्ववत सूरु झाली.