Kharghar Lift Incident Pudhari
रायगड

Kharghar Lift Incident: खारघरमध्ये २०व्या मजल्यावर लिफ्टमध्ये पाच वर्षीय मुलगा अडकला; अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले

घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन दलाच्या खारघर केंद्रातील जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चिमुकल्याची सुखरूप सुटका केली.

पुढारी वृत्तसेवा

खांदा कॉलनी: खारघर-तळोजा जेल रोड परिसरातील सेक्टर १९ मधील खारघर रेजन्सी आयकॉन सोसायटीच्या २०व्या मजल्यावर लिफ्टमध्ये पाच वर्षीय मुलगा अडकल्याची घटना गुरुवारी (१८ सप्टेंबर) सायंकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन दलाच्या खारघर केंद्रातील जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चिमुकल्याची सुखरूप सुटका केली.

सायंकाळी ७.२० वाजता अग्निशमन दलाला लिफ्टमध्ये मुलगा अडकल्याची वर्दी मिळाली. अवघ्या आठ मिनिटांत, ७.२८ वाजता अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले. पाहणी केली असता २०व्या मजल्यावर लिफ्ट अडकली असून त्यामध्ये पाच वर्षीय मुलगा असल्याचे जवानांच्या निदर्शनास आले.

लिफ्टची चावी वापरून दरवाजा उघडण्याचा सुरुवातीला प्रयत्न करण्यात आला. मात्र, दरवाजा उघडण्यात यश आले नाही. त्यामुळे जवानांनी प्रसंगावधान राखत लिफ्टच्या दरवाजाच्या फटीतून मुलाला पाण्याची छोटी बाटली दिली. तसेच त्याला धीर देत घाबरून जाऊ नये, असे सांगितले.

यानंतर अग्निशमन जवानांनी हायड्रोलिक स्प्रेडर आणि कटरच्या साहाय्याने लिफ्टचा दरवाजा उघडला. अथक प्रयत्नांनंतर मुलाला सुरक्षितपणे लिफ्टमधून बाहेर काढण्यात आले.लिफ्टमधून बाहेर येताच चिमुकला आपल्या वडिलांना बिलगून रडू लागला. मुलगा सुखरूप असल्याचे पाहून त्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

या प्रसंगानंतर कुटुंबीयांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे मनापासून आभार मानले.या बचावकार्यात अग्निशमन प्रणेता प्रशांत दरेकर, फायरमन पी. आर. पाटील, पी. सी. सोंडे, सी. सी. पवार आणि यंत्रचालक पी. एस. निकाळे यांनी सहभाग घेतला. जवानांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT