Water Scarcity Pudhari
रायगड

Kharapaat Drinking Water Problem: 50 वर्षांची तहान; हेटवणे धरणाजवळ असूनही खारेपाट अजूनही पाण्याविना

24 गावे, 36 वाड्या आजही टँकरवर अवलंबून; प्रत्येक निवडणुकीत आश्वासनांचीच रिपीट

पुढारी वृत्तसेवा

पेण : कमलेश ठाकूर

पेण तालुक्यातील खारेपाट भागात 24 गावे आणि 36 वाड्या वस्ती आहे मात्र गेली 50 वर्षापासून येथील पिण्याच्या पाण्याची समस्या मात्र आजतागायत सुटलेली नाही. विशेष म्हणजे येथून 15 किमी अंतरावर हेटवणे सारखे विशाल धरण आहे आणि या धरणातून नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा होतो. मात्र पेण तालुक्यातील पाणीटंचाई असणाऱ्या गावांना पाणी पुरवठा होत नाही.

गेली कित्येक वर्षापासून अनेक मंत्री महोदयांनी आपल्या निवडणूक प्रचारावेळी पुढील काही महिन्यात पाईप लाईन टाकून दिली जाईल असे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मागील दोन वेळच्या प्रचारात पाणी प्रश्न सोडविला जाईल असे सांगितले. मात्र आजतगायत पाणी काही पोहोचले नाही.

रायगड जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडूनही योग्य नियोजनाअभावी रायगड जिल्ह्याला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. जिल्ह्यातील नद्यांवर पुरेशी धरणे नसल्याने पावसाचे पाणी थेट समुद्राला जाऊन मिळते. या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून टंचाई निवारण आराखडा तयार करुन, उपाययोजना करण्यात येतात. त्यानुसार टंचाईग्रस्त गावांना टँकर, बैलगाडीच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येते, मात्र हे नियोजन पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुरेशे नसल्याचे दिसून येते. जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे.

कोट्यवधीचा खर्च वाया

दरवर्षी 24 गावे आणि 36 वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पोहोचविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र हे पाणी प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक माणसापर्यंत मात्र पोहोचत नाही. येथील नागरिकांना तर घरातील लग्न सोहळा, वा मंदीर उत्सव वेळी विकतचे पाणी आणावे लगत आहे.

प्रत्येक निवडणुकीत नेत्यांची आश्वासने

प्रत्येक निवडणुकीत येथील उमेदवार मात्र पाणी प्रश्न ह्यावेळी आम्ही सोडविणार असल्याचे सांगत असतो. या खारेपाट प्रभागातील आताच्या जिल्हा परिषद उमेदवारांनी आपापले पूर्वीचे पक्ष यावेळी बदलले. खारेपाट प्रभागात वडखळ जिल्हापरिषद मतदार संघ येतो. या प्रभागातून उभ्या असणाऱ्या सर्वच उमेदवारांनी आपले पूर्वीचे पक्षच बदलले आहेत. मागच्या वेळी शेकापमधून जिंकून आलेले प्रभाकर म्हात्रे हे आता भाजपमधून निवडणूक लढवीत आहेत.

तर मूळचे भाजपचे असणारे मिलिंद पाटील हे आता शिंदे शिवसेनामधून निवडणूक लढवीत आहेत. तर यापूर्वी शिवसेनेतून जिंकलेले संजय जांभळे हे आता शेकापमधून निवडणूक लढवीत आहेत. तर मूळचे शेकापमध्ये नगरसेवक झालेले समीर म्हात्रे हे आता शिवसेना ठाकरे गटातून निवडणूक लढवीत आहेत. हे चारही जण एकमेकांच्या विरोधात्‌‍ निवडणूक लढत असून यांचेसाठी येणारे मंत्री नेते पुन्हा एकदा पाणी प्रश्न सोडविला जाईल असेच सांगत आहेत.

मंत्रालयावर पाणीमोर्चा

आताचे खासदार व दहावर्षापूर्वी असणारे आमदार धैर्यशील पाटील हे शेकापमध्ये असताना पेण ते मंत्रालय असा विराट पायी मोर्चा काढला होता. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खारेपाट पाणी प्रश्नासाठी अडतीस कोटी रुपये मंजूर केले. मात्र त्यानंतरही 15 किमीची पाईपलाईन अर्धवट राहून अजूनही पाणी काही हेटवणे धरणातून शहापाडा धरणापर्यंत पोहोचले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT