खालापूर तालुक्याचे आरोग्य बिघडले pudhari photo
रायगड

Khalapur health center issue : खालापूर तालुक्याचे आरोग्य बिघडले

आरोग्य केंद्रामध्ये औषधांचा तुटवडा, रुग्णांची होतेय हेळसांड

पुढारी वृत्तसेवा

खोपोली ः प्रशांत गोपाळे

खालापूर तालुका हा मुंबई आणि पुणे या दोन महानगराच्या मध्यवर्ती असलेले ठिकाण असल्याने हा तालुका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने जिल्ह्यात चर्चेत असतो. त्यातच या तालुक्याचा मुख्य असलेला प्राथमिक आरोग्य केंद्र हा अनेक गोरगरीब जनतेला आधार ठरत असताना आताच्या घडीला या आरोग्य केंद्रात रूग्णांची अपुऱ्या औषधामुळे मोठी हेळसांड होत असल्याने येथील आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

खालापुर तालुक्यातून जुना मुंबई पुणे हायवे व त्याचबरोबर मुंबई - पुणे एक्सप्रेस वे गेल्याने या ठिकाणाला महाराष्ट्र राज्यात वेगळेच नाव प्राप्त झाले आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी,ठाकूर समाज वास्तव्यास असल्याने या समाजाबरोबर अनेक गोरगरिबांना उपचारासाठी सरकारची आरोग्य यंत्रणा कामास येत असते. त्यामुळे अनेकजण शासनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतात.

आजच्या महागड्या युगात अनेकांना खाजगी रुग्णालयात उपचार घेणे शक्य नसल्याने बहुतांश नागरिक प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्र जात उपचार घेत आपल्या शरीरावर निदान करत असतात. त्यामुळे अनेक गोरगरीब जनतेला सरकारचे प्राथमिक आरोग्य केंद्र आधारवड ठरत असताना खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात जात अनेकांनी उपचार घेतले असता आत्ताच्या घडीला या आरोग्य केंद्रात शासनाच्या औषधांच्या तुटवडा भासत असल्याने या ठिकाणी जाणाऱ्या रुग्णाला उपचाराविना माघारी घरी परतावे लागत आहे.

उपचार घेण्यासाठी काहीजण खिशाला कात्री लावत खाजगी रुग्णालयात उपचार घेतात. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणा सध्याच्या घडीला रामभरोशी बनल्याने येथील आरोग्य यंत्रणेच्या कारभार बाबत सर्वसामान्य जनता नाराजी व्यक्त करत आहेत.

औषधाविनाच परतावे लागते

तालुक्यात अनेक शासकीय यंत्रणेबाबत तीव्र नाराजी काही ठिकाणी होत असताना त्यातच आता प्राथमिक आरोग्य केंद्रातील यंत्रणेबाबत अनेक जण नाराजी व्यक्त करत आहेत. यामध्ये अपुऱ्या औषधांच्या तुटवण्यामुळे येथील येणाऱ्या रुग्णांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. याठिकाणी औषधांचा तुटवडा भासत असल्याने अनेक रुग्णांना उपचाराविना घरी माघारी जावे लागते. तर काहीजण बाहेरील खासगी मेडिकलमधून महागडी औषध खरेदी करत आपल्यावर उपचार घेत असल्याचे पहावयास मिळत आहे.

खालापूर तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र हा आदिवासी, ठाकूर समाजातील जनतेसह गोरगरीब नागरिकांना मोठा दिलासा देत आहे. मात्र, रुग्णांना औषधांची कमतरता भासत असल्याने उपचाराविना परत जावे लागते. औषधांच्या तुटवडयाची समस्या दूर करण्यासाठी जिल्हा स्तरावर पाऊले उचलावी. जर ही पाऊले उचलली नाहीतर गोरगरिब रुग्णांना मोठा भुदंड सोसावे लागेल किंवा मोठ्या आजाराला सामोरे जावे लागेल.
अनिल पिंगळे, सामाजिक कार्यकर्ते
खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची संख्या अधिकच आहे. 11 मार्च 2026 ला औषध पुरवठा व्हावा यासाठी 95 प्रकारची औषधे मिळावीत अशी मागणी केली होती मात्र 69 प्रकारची औषधे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे रुग्णांना उपलब्ध असणारी औषधे दिली जातात आणि काही औषधे खाजगी मेडिकल मधून घेण्याच्या लिहून दिली जातात. या ठिकाणी खालापूर ग्रामीण भाग असल्याने सर्वात जास्त रुग्ण येत असतात तर खोपोलीमधीलही रुग्ण येत असतात त्यामुळे पुरेसा औषध पुरवठा व्हावा अशी मागणी सातत्याने प्रशासनाकडे करीत असतो.
अनिल कुमार शाह, वैद्यकीय अधिकारी खालापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT