Khadipatta Water Crisis Pudhari
रायगड

Khadipatta Water Crisis: पाऊस संपताच खाडीपट्ट्यातील नद्या पडल्या कोरड्याठाक; ऑक्टोबरमध्येच नदी-नाले आटले

कमी पाऊस, बंधाऱ्यांचा अभाव आणि वाढत्या तापमानाचा परिणाम; शेती, जनावरे आणि महिलांच्या पाणीसमस्येत वाढ होण्याची भीती

पुढारी वृत्तसेवा

खाडीपट्टा: खाडीपट्टा विभागात यंदा पावसाळा संपताच भीषण वास्तव समोर आले आहे. खाडीपट्ट्यातील प्रमुख नद्या, ओढे आणि नाले ऑक्टोबर महिन्यातच कोरडेठाक पडले आहेत. पाण्याचा एक थेंबही शिल्लक न राहिल्याने यंदा पाण्याची समस्या भरपूर प्रमाणात जाणवणार असून, ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली आहे.

ज्या नदीपात्रात गुडघाभर पाणी वाहायला हवे होते, तिथे आता फक्त दगड-गोटे आणि एखाद्या डबक्यात साचलेले थोडेसे पाणी शिल्लक आहे. हिरवीगार झाडी असली तरी नदीपात्राने तळ गाठला आहे.

दरवर्षी डिसेंबर-जानेवारीनंतर कोरड्या पडणाऱ्या नद्या यंदा ऑक्टोबरमध्येच आटल्याने धोक्याची घंटा वाजली आहे. प्रखर उन्हाच्या तडाख्याने लोकांच्या अंगाची लाही-लाही होत आहे. सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाचे चटके इतके वाढत आहेत की, शेतात काम करणेही मुश्किल झाले आहे.

स्थानिक जाणकार आणि ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या मते यामागे अनेक कारणे असल्याचे सांगताना त्यांनी सांगितले, कमी पाऊस आणि धरणांचा अभाव त्यामुळे यंदा पावसाने वेळेवर निरोप घेतला. पाणी अडवण्यासाठी बंधारे, चेक डॅम नसल्याने आलेले सर्व पाणी वाहून गेले. तसेच बेसुमार वृक्षतोड आणि वाळू उपसा जे डोंगरांवरील वृक्षतोड आणि नदीपात्रातील अवैध वाळू उपशामुळे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

तसेच वाढते तापमान पाहता जागतिक तापमानवाढीचा फटका कोकणालाही बसत असून, पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. परिणाम - शेती, जनावरे आणि महिलांचे हालपाण्याअभावी रब्बी हंगामातील भातशेती, भाजीपाला पिके धोक्यात आली आहेत. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही, त्यामुळे दूध उत्पादन घटले आहे. अनेक गावांमध्ये विहिरींनी तळ गाठल्याने महिलांना १ ते २ किलोमीटर दूरवरून डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागत आहे.

पाणीपुरवठ्याच्या योजना पूर्ण करण्याची मागणी

खाडीपट्ट्यातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, तातडीने नदी-नाल्यांवर बंधारे घालावेत, जलजीवन मिशनची कामे त्वरित पूर्ण करावीत आणि टँकरने पाणीपुरवठा करण्याची तयारी आत्तापासूनच करावी. अन्यथा यंदा खाडीपट्ट्यासह तालुक्यातील जनतेला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.

रखरखत्या पडणाऱ्या उन्हामुळे भात पिकाचे देखील नुकसान पोहचणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या दरम्यान पडलेल्या पावसानंतर उत्सवाच्या समाप्तीनंतर एकही पावसाचा थेंब पडलेला नाही. त्यामुळे सगळया बाजूने शेतकऱ्यांसह सर्वांचे यावेळी हाल होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT