विक्रमगड : सचिन भोईर
विक्रमगड तालुक्यातील दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील पाणीटंचाईवर शाश्वत उपाय म्हणून कावळे येथे उभारण्यात आलेल्या सुमारे ७० लाख रुपये खर्चाच्या भव्य चेक डॅम (बंधारा) प्रकल्पाचे लोकार्पण नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या पुढाकारातून, विविध सामाजिक संस्था, देणगीदार आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने साकारलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे परिसरातील १८ गावांच्या जलसुरक्षेला मोठा आधार मिळणार आहे.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ चे जिल्हापाल डॉ. मनीष मोटवानी यांच्या हस्ते बंधाऱ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या अध्यक्षा प्रज्ञा मेहता, प्रकल्प संचालक राहुल पटेल, जिल्हा समन्वयक भगवान पाटील, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे महाकाली हाइट्सच्या अध्यक्षा सरोज आनंद, विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने झाली. तारपा वादन, पारंपरिक नृत्य आणि लोककलांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांनी मान्यवरांचे स्वागत केले. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते भिकल्या धिंडाजी यांनी स्वतः तारपा वादन करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे पारंपरिक संस्कृती आणि विकास यांचा सुंदर संगम कार्यक्रमात अनुभवायला मिळाला.
उद्घाटनस्थळ जंगल परिसरात असल्याने मान्यवर, रोटरी सदस्य आणि ग्रामस्थांनी नैसर्गिक मार्गाने पायी प्रवास करून बंधाऱ्याच्या ठिकाणी पोहोचत उद्घाटन सोहळ्यात सहभाग घेतला. या अनुभवातून उपस्थितांना जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधिक जवळून जाणून घेता आले.
सुमारे ८० मीटर लांबीचा हा भव्य बंधारा पावसाचे पाणी अडवून भूजल पुनर्भरणास चालना देणार आहे. त्यामुळे परिसरातील भूजलपातळीत वाढ होऊन विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांना वर्षभर पाणी उपलब्ध राहण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाचा थेट लाभ कावळेसह आसपासच्या १८ गावांतील हजारो नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांना होणार आहे.
या भागातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून असल्याने खरीप हंगामानंतर सिंचनासाठी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत असे. मात्र या बंधाऱ्यामुळे सिंचनक्षमता वाढून पीक वैविध्यीकरण, उत्पादनवाढ आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे. तसेच उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवरही मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
यावेळी बोलताना जिल्हापाल डॉ. मनीष मोटवानी म्हणाले, जलसंधारण ही केवळ पाणी साठवण्याची प्रक्रिया नसून ग्रामीण विकास, शेती समृद्धी आणि पर्यावरण संवर्धनाचा पाया आहे. कावळे येथील हा प्रकल्प आगामी काळात हजारो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणेल. यावेळी त्यांनी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट, जागतिक भागीदार रोटरी क्लब ऑफ ब्रिजपोर्ट, रस्टमजी डेव्हलपर्स, इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट तसेच प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी योगदान देणारे आरसीसी वाडा वीर्सचे प्रमुख संदीप हडबळ आणि त्यांच्या टीमचे विशेष कौतुक केले.
रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या अध्यक्षा प्रज्ञा मेहता यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील पाणी समस्या दूर करण्यासाठी रोटरी सातत्याने कार्यरत असून कावळे येथील बंधारा हा केवळ जलसंधारण प्रकल्प नसून ग्रामीण भागाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देणारा उपक्रम आहे. प्रकल्प संचालक राहुल पटेल यांनी प्रकल्पाच्या उभारणीसाठी सहकार्य करणाऱ्या संस्था, स्वयंसेवक आणि ग्रामस्थांचे आभार मानले. तर सरोज आनंद यांनी जलसंवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
जलसंधारण, भूजल पुनर्भरण, पर्यावरण संवर्धन, शेती विकास आणि ग्रामीण समृद्धी यांना चालना देणारा हा प्रकल्प आगामी अनेक वर्षे परिसरासाठी वरदान ठरणार आहे. रोटरीच्या सेवाभावी कार्यातून साकारलेला हा उपक्रम जलसुरक्षित, स्वावलंबी आणि समृद्ध ग्रामीण भाग घडविण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.