मुरुड जंजिरा : सुधीर नाझरे
रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काशीद ग्रामपंचायत सरपंच संतोष जयराम राणे यांचे पद अनहर्त ठरवले होते.सरपंच संतोष राणे यांनी महाराष्ट्र शासनाची जागा बांधकामासह नोटरी करून सुमारे 12 लाख रुपयांना विकली,असा आक्षेप घेण्यात आला होता.यावर निर्णय देताना रायगड जिल्हाधिकारी यांनी त्यांचे पद अनहर्त ठरवत त्यांना सरपंच पद पासून दूर करण्यात आले होते.यावर सरपंच राणे यांनी कोकण आयुक्तांकडे दाद मागितली होती.
सर्व कागदपत्रांची तपासणी करून व न्यायालयाचे निकाल तपासून अखेर कोकण आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांनी जिल्हाधीकारी रायगड यांचा निकाल रद्दबातल ठरवल्याने सरपंच संतोष राणे यांचे पद अबाधित राहिले आहे.
काशिद येथील स.नं. 28/2 या महाराष्ट्र शासन नोंद असलेल्या जागेवर अतिक्रमण झाले आहे किंवा नाही यासाठी अधिक्षक, भूमी अभिलेख, रायगड यांचेकडून मोजणी होणे आवश्यक आहे. या सर्वे नंबरमध्ये अतिक्रमण केल्याचे पुरावे आढळत नाही.
ग्रामपंचायत काशिद मालमत्ता क्रमांक 517 या अभिलेखात ग्रामपंचायत नमुना नंबर आठच्या उताऱ्यांमध्ये मालक सदरी राजेंद्र गावंड याचे नाव दिसून येते तसेच भोगवटादार म्हणून स्वतः असे नमूद केलेले आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी हा अतिक्रमण केलेला प्लॉट आहे, हे सिध्द होत नाही.
संतोष राणे यांनी भूमी अभिलेख, मुरुड यांना पत्र देऊन स.नं. 28/2 ची मोजणी केली किंवा कसे याबाबत माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागितली असता, याबाबतचा कोणताही डाटा आढळ होत नाही, असे उत्तर दिलेले आहे. यावरुन स.नं. 28/2 ची मोजणी झालेली नाही हे स्पष्ट होते.
संतोष राणे सरपंचपदावर पुन्हा कार्यरत
या प्रकरणातील सर्व बाबींचे परीक्षण करून कोकण आयुक्त डॉ.सुर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी रायगड यांनी दिलेला निर्णय रद्द करून हे प्रकरण पुन्हा परीक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेला निर्णय रद्द झाल्याने काशीद ग्रामपंचायत सरपंच संतोष राणे यांना मोठा दिलासा मिळाला असून सरपंच पदावर ते पुन्हा कार्यरत राहणार आहेत.