सुधीर नाझरे
मुरुड जंजिरा: मुरुड तालुक्यातील काशीद या ठिकाणी अत्याधुनिक जेट्टी बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून २३ जानेवारी २०१९ रोजी शासकीय आदेश काढून या कामासाठी ११२.४६ कोटी रुपये मंजूर करून या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
मात्र अद्याप जेट्टीचे काम रखडलेले आहे. मुरुड तालुक्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने ही जेट्टी महत्वाची आहे.
मुरुड तालुक्यातील काशीद हे ठिकाण पर्यटकांसाठी आवडते ठिकाण असून येथे दरवर्षी सात लाखापेक्षा जास्त पर्यटक भेटी देत असतात. मुंबई येथून येणाऱ्या पर्यटकांची सुविधा सध्या मांडवा येथून करण्यात येत आहे.
मांडवा ते काशीद हे प्रवास अंतर तीन तासांचे आहे. हे अंतर वाचवण्यासाठी पर्यटकांना थेट सुविधा मिळावी यासाठी काशीद ते मुंबई हे थेट अंतर जलमार्गाने जोडण्यासाठी सदरील जेट्टीला मंजुरी देण्यात आली.
मुंबई ते काशीद जलमार्गाने किमान दोन तासात गाठता येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना येथे जलद गतीने पोहचता येणार आहे. ब्रेकवॉटर वॉल काम पूर्ण होऊन वर्ष झाले. नूतन जेट्टीचा ४१ कोटींचा प्रस्ताव मंजुरीला गेला.