Kashid jetty project delay Pudhari
रायगड

Kashid jetty project delay: सात वर्षांनंतरही काशिदच्या अत्याधुनिक जेट्टीचे काम रखडले

112 कोटींच्या प्रस्तावाला मिळालेली मंजुरी; आतापर्यंत फक्त ब्रेकवाटरचे काम पूर्ण; पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची जेट्टी

पुढारी वृत्तसेवा

सुधीर नाझरे

मुरुड जंजिरा: मुरुड तालुक्यातील काशिद समुद्र किनाऱ्यावरील जेट्टीचे काम सध्या रखडले आहे. या जेट्टीमुळे मुंबईतील नागरिका आणि पर्यटक यांना जलमार्गे दोन तासात मुरुड गाठता येणार आहे. त्यामुळे त्यांचा प्रवासातील एक तास वाचणार आहे. पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या या जेट्टीचे काम लवकर पूर्ण आवश्यक आहे. जेट्टीचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी मुरुडकर करीत आहेत.

मुरुड तालुक्यातील काशिद समुद्र किनारी अत्याधुनिक जेट्टी बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून 23 जानेवारी 2019 रोजी शासकीय आदेश काढून या कामासाठी 112.46 कोटी रुपये मंजूर करून या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मुरुड तालुक्यातील काशीद हे ठिकाण पर्यटकांसाठी आवडते ठिकाण असून येथे दरवर्षी सात लाखापेक्षा जास्त पर्यटक भेटी देत असतात.

मुंबई येथून येणाऱ्या पर्यटकांना जलमार्गे सध्या मांडवा येथून यावे लागते. मांडवा ते काशिद हे प्रवास अंतर तीन तासांचे आहे. हे अंतर वाचवण्यासाठी पर्यटकांना थेट सुविधा मिळावी यासाठी काशिद ते मुंबई हे थेट अंतर जलमार्गाने जोडण्यासाठी सदरील जेट्टीला मंजुरी देण्यात आली. मुंबई ते काशिद जलमार्गाने किमान दोन तासात गाठता येणार आहे.

त्यामुळे पर्यटकांना येथे जलद गतीने पोहचता येणार आहे. ब्रेकवॉटर वॉल काम पूर्ण होऊन वर्ष झाले. नूतन जेट्टी 41 कोटींचा प्रस्ताव मंजुरीला गेला, मंजूर झाला, टेंडर निघाले परंतु काम सुरु झाले नाही. पर्यटक, स्थानिक व व्यावसायिक दिवाळी हंगामासाठी सज्ज आहे. जेट्टी झाली आणि मुंबईहून पर्यटक आले तर आर्थिक मंदीपासून सुटका होईल असे बोलले जाते.

मुरुड तालुक्यातील काशिद हे ठिकाण पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध असून येथे प्रत्येक दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी असते. मुंबई भागातील लाखो पर्यटक काशीद समुद्र किनारी फिरण्यासाठी येत असतात. त्यामुळे आता रस्त्याचा प्रवास पर्यटकांचा वाचणार असून थेट जल प्रवासाद्वारे काशीद गाठणे खूप सोपे जाणार आहे. सदरची जेट्टी दुहेरी हेतू ठेऊन बांधण्यात येत आहे. काशीद येथील जेट्टीमधून प्रवासी वाहतूक व रो-रो सेवा सुद्धा सुरु करून असंख्य पर्यटकांचा लोंढा मुरुडकडे आकर्षित होणार आहे.

काशीद जेटी सुरु झाली तर मुंबईहून रो-रो बोट सेवा सुरु होणार आहे. त्यामुळे दिवाळीत येणारे विदेशी पर्यटक कोकणाकडे वळतील. रो-रो बोट सेवेत एकवेळी 100 कार व 300 प्रवाशी प्रवास करतील. रायगडचे पर्यटन बहरणार असले तरी जेटी सुरू कधी होणार असा सवाल मुरुडकर विचारीत आहेत.

आज कोकणात सर्वात सुंदर किनारे मुरुड, काशिद, नागाव परिसरात आहेत. काशिद अतिशय प्रसिद्ध असल्याने दर रविवारी हजारो पर्यटक येथे आनंद घेण्यासाठी आपली वाहने खराब रस्त्यावरून येतात. त्यांना खूप त्रास होतो. जेट्टी लवकर झाली तर आपली वाहने घेऊन पर्यटक समुद्र सफारीचा आनंद घेणार आहेत. पुणे, कोल्हापूर, सांगली येथून येणारे पर्यटक काशीदला येऊन पुढे रो-रो बोटीतून मुंबई दर्शन करायला जाऊ शकतात.
- हेमंत गांधी, पर्यटक, मुंबई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT