Karvanda fruit extinction pudhari photo
रायगड

Raigad News : अखेरची घटका मोजतेय डोंगरची ‌‘काळी मैना‌’

खाडीपट्टयात करवंदांची झुडपे बेचिराख रानमेवा संपला, रोजगार संपला

पुढारी वृत्तसेवा

खाडीपट्टा : रघुनाथ भागवत

कधी काळी एप्रिल-मे महिन्यात डोंगर-दऱ्या काळ्याशार दिसायच्या. कारण? करवंदाची पिकलेली झुडपे. ‌‘जंगलची काळी मैना‌’ म्हणून ओळखले जाणारे हे रानफळ आता वणवे, वृक्षतोड आणि माती उत्खननामुळे नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे, अशी भीती निसर्गप्रेमी व्यक्त करत आहेत. खाडीपट्टयात फेरफटका मारला असता सर्वत्र वणव्याने झुडपे जळून खाक झालेले पाहायला मिळत आहेत.

भाच्यांचा हिरमोड

सुट्टी लागली की ‌‘मामाच्या गावाला जाऊया‌’ म्हणणारी भाचे कंपनी यंदा हिरमुसली झाली आहे. डोंगरावर जाऊन करवंदे, जांभळे, आळू तोडण्याची मजा आता फक्त आठवणीत उरणार आहे. “पोरगं म्हणतं, मामा करवंदं कुठाय? काय उत्तर देऊ त्याला?” असे खाडीपट्टयातील मामा हताशपणे सांगतात.

वणवा आणि उत्खनन त्यामुळे काळी मैना बेचिराख

खाडीपट्टयात फेरफटका मारला तर सर्वत्र चित्र एकच काळेकुट्ट, बेचिराख डोंगर. वणव्याने फक्त मोठी झाडंच नाही, तर औषधी वनस्पती आणि करवंदाची काटेरी झुडपंही गिळंकृत केली. त्यात भर म्हणजे बेसुमार माती उत्खनन. जेसिबी च्या एका घावात शेकडो जाळ्या मुळासकट उन्मळून पडतात. जिथे पूर्वी करवंदामुळे रान काळं दिसायचं, तिथे आता वणव्यामुळे काळं दिसतंय फरक एवढाच.

संवर्धनाची शेवटची हाक

खाडीपट्टयाचे हवामान करवंदाला मानवणारे. म्हणूनच इथे त्याची झुडपे मुबलक होती. पण आता क्वचितच एखादे झाड दिसते. “हे असेच सुरू राहिले तर 5 वर्षांत करवंद फक्त चित्रात उरेल. वन विभागाने, ग्रामपंचायतींनी तातडीने करवंद लागवड मोहीम हाती घ्यावी,” अशी मागणी पर्यावरण अभ्यासक प्रा. नंदकुमार जाधव यांनी केली.

गावरान आंबा, जांभूळ, आळू पाठोपाठ आता करवंदही गेलं तर ‌‘रानमेवा‌’ हा शब्दच शब्दकोशात जमा होईल. काळी मैना वाचवायची असेल तर वणवे रोखावे लागतील, उत्खननाला लगाम घालावा लागेल. नाहीतर उद्याचा आदिवासी पोरगा फक्त गुगलवर ‌‘करवंद म्हणजे काय?‌’ एवढंच सर्च करत बसेल.

आदिवासींची थाळी झाली रिकामी

डोंगरदऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधव-भगिनींचा हा पारंपरिक रोजगार. फेब्रुवारीत पांढरी फुले, मार्चमध्ये हिरवी आंबट फळे आणि एप्रिल अखेर काळीशार गोड करवंदे. पाटीभर करवंदे विकून चार पैसे घरी यायचे. “आता जंगलात जाळीच उरली नाहीत. पोरांना काय खाऊ घालायचे ?” असा सवाल तेलंगे आदिवासी वाडी येथील हिराबाई यांनी डोळ्यात पाणी आणून विचारला. वणव्यात जाळीच जळून नष्ट झाल्याचे पाहायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT