पनवेल: कर्नाळा समूह ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कल्हे गावाजवळ बामणडोंगरी आदिवासी वाडीच्या खाली प्रस्तावित असलेल्या 'ऑक्सिजन पार्क' गृहनिर्माण प्रकल्पामुळे पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मात्र या संपूर्ण परिसरातील वृक्षतोडीबाबत वनविभागाने केलेल्या पंचनाम्यात केवळ ३५ झाडांचीच विनापरवाना तोड झाल्याचे नमूद करण्यात आल्याने प्रत्यक्ष परिस्थिती आणि शासकीय नोंदीतील तफावत आता चर्चेचा विषय बनली आहे.
प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरून मातीचे उत्खनन करण्यात आल्याचा तसेच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. कर्नाळा अभयारण्याच्या आसपासचा परिसर हा घनदाट वनराई आणि जैवविविधतेसाठी ओळखला जातो. कल्हे-बामणडोंगरी परिसरही याला अपवाद नव्हता.
या भागात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात झाडे आणि वनस्पतींचे आच्छादन होते. मात्र गृहनिर्माण प्रकल्पासाठी जमीन विकसित करण्याच्या प्रक्रियेत डोंगराचा मोठा भाग खोदण्यात आल्याचे चित्र आहे. माती आणि दगडाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याने परिसराचा नैसर्गिक भूभाग बदलला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
वनविभागाच्या नोंदीनुसार साग, साबर, बोंडरा, पारंगा, ऐन आणि कुडा आदी प्रजातींच्या झाडांची विनापरवाना तोड झाल्याचे नमूद आहे. त्यानुसार २२ झाडे आणि बंधमुक्त १३ झाडे, अशी एकूण ३५ झाडांची नोंद करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
मात्र स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ज्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरण्यात आला आणि वनराई हटविण्यात आली, त्या क्षेत्रात केवळ ३५ झाडेच होती का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे वनविभागाने केलेल्या पंचनाम्याची स्वतंत्रपणे फेरतपासणी करावी, अशी मागणी आता पुढे येत आहे. या कामाबाबत तक्रारींची कागदपत्रांच्या आधारे चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
पंचनाम्याचा आकडा; प्रत्यक्ष परिस्थितीत तफावत ?
या परिसरातील नागरिकांचा मुख्य आक्षेप हा केवळ वृक्षतोडीपुरता मर्यादित नाही. मोठ्या प्रमाणात डोंगर उत्खनन करून जमीन सपाट करण्यात आली असल्याने पर्यावरणीय हानीचे स्वतंत्र मूल्यांकन झाले आहे का, हाही प्रश्न उपस्थित होत आहे.
वृक्षतोडीची संख्या मोजताना केवळ कापलेल्या झाडांच्या खोडांची नोंद पुरेशी आहे का, तसेच झुडपे, लहान झाडे आणि इतर वनस्पतींच्या नाशाचा विचार करण्यात आला का, याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर सागाचे झाड काही वर्ष तोडता येत नाही. तरीसुद्धा कसे तोडले गेले असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
बामणडोंगरी वाडीच्या सुरक्षिततेचाही प्रश्न !
डोंगराचा नैसर्गिक उतार बदलल्याने मुसळधार पावसाच्या काळात माती वाहून जाणे, जमीन खचणे किंवा उत्खनन केलेल्या भागातून मातीचा भराव खाली येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बामणडोंगरी आदिवासी वाडीतील नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.विशेषतः पावसाळ्यात या भागात अतिवृष्टी झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
तक्रारीनंतर महसूल विभागाची पाहणी !
या प्रकरणी स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत तसेच तहसीलदारांकडे तक्रारी केल्या आहेत. संबंधित विभागांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. तसेच या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. त्यानंतर मंडळ अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. याप्रकरणी सुनावणीही आयोजित करण्यात आली - आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या पाहणीत काय निष्पन्न होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
वृक्षतोड झाल्यावर ३ महिन्यांनी दंडवसुली !
वनविभागाच्या कागदोपत्री नोंदीनुसार १३ ऑक्टोबर २०२५ रोजी वृक्षतोड झाल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यानंतर संबंधितांकडून १२ जानेवारी २०२६ रोजी २८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे नमूद असल्याचा दावा करण्यात आला आहे. वृक्षतोडीची तारीख आणि दंडात्मक कारवाई यामध्ये सुमारे तीन महिन्यांचे अंतर आहे. वृक्षतोड झाल्यानंतर काही महिन्यांनी दंड आकारून कारवाई पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले का, अशी शंका स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.