Water Tanker Pudhari
रायगड

Karjat water scarcity: कर्जत तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा वाढल्या

उन्हाळ्यात दोन्ही नद्या पडल्या कोरड्या, चार गावात टँकरद्वारे पाणी

पुढारी वृत्तसेवा

कर्जत: कर्जत तालुक्यातील दोन नद्या बारमाही वाहत असतात. तर दोन प्रमुख नद्या आणि उपनद्या या उन्हाळ्यात कोरड्या असतात. त्यामुळे दुर्गम आणि आदिवासी भागात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीटंचाई वाढली असून ग्रामस्थांच्या मागणीनुसार कर्जत तालुक्यात शासनाने टँकर सुरू केले आहेत. तालुक्यातील चार गावे आणि चार वाड्या यांना शासनाच्या टँकरमधून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून आणखी चार गावांनी टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे.

कर्जत तालुक्यात दरवर्षी मार्च महिना सुरू झाला की पाणीटंचाई जाणवू लागते. तालुक्यातून टाटा धरणाच्या पाण्यावर पेज नदी उल्हास नदीला मिळेपर्यंत बारमाही वाहते. मात्र त्याआधी उल्हास नदी कोरडे असते, तसेच तालुक्यातून वाहणाऱ्या चिल्हार, पोश्री या मोठ्या नद्या उन्हाळ्यात कोरड्या असतात. त्याचवेळी अनेक उपनद्या या उन्हाळ्यात कोरड्या असल्याने तालुक्यात पाणीटंचाईचे दुर्भिक्ष्य उन्हाळा सुरू झाला की अधिक प्रमाणात जाणवते. त्यात जलजीवन मिशन योजनेचे अनेक नळपाणी योजना निधी अभावी रखडल्या आहेत.

या टँकरमधून पाणी टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे. अशाणे नंतर त्याच ग्रामपंचायत मधील कोशाने, उमरोली तसेच ओलमन ग्रामपंचायत मधील झुगरेवाडी या चार गावांना शासकीय टँकर येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी सुरू केले आहेत. त्याचवेळी किरवली ठाकूरवाडी, सावरवाडी ठाकूरवाडी, पळसदरी ठाकूरवाडी, वर्ण ठाकूरवाडी या ठिकाणी शासकीय टँकरमधून पाणी पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे.

गतवर्षी पहिला शासकीय टँकर सुरू

तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतमधील अशाणे गावात गतवर्षी पहिला शासकीय टँकर सुरू झाला होता. यावर्षी देखील पहिला शासकीय टँकर अशाणे गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सुरू झाला आहे. शासनाने जिल्हाधिकारी स्तरावर टँकर निविदा मागवली होती, त्यानुसार कर्जत तालुक्यासाठी 5 टँकर मंजूर झाले असून त्या टँकरमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता ही 14 हजार लिटर एवढी आहे.

20 गावे व 39 आदिवासी वाड्या टंचाईग्रस्त

यावर्षी कर्जत तालुक्यातील 20 गावे आणि 39 आदिवासी वाड्या या पाणीटंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. या सर्व पाणीटंचाईग्रस्त भागातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी शासनाने टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू करण्याचे पाणीटंचाई कृती आराखड्यात नमूद केले होते.

पाणीटंचाई असलेल्या आणखी चार ठिकाणी टँकरची मागणी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी साईट व्हिजीट केल्यानंतर टँकर सुरू करण्याची कार्यवाही केली जाईल.
- केशव जाधव, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT