नेरळ ः आनंद सकपाळ
कर्जत तालुक्यातील मौजे कुरकुलवाडी, वारे येथे घडलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्याच्या खुनाच्या प्रकरणाने संपूर्ण तालुका हादरला आहे. माझ्या मुलाला मारले म्हणून मी मारले, अशी धक्कादायक कबुली आरोपी जयवंता गुरुनाथ मुकणे या महिलेने नेरळ पोलिसांसमोर दिली आहे. जयदीप गणेश वाघ (वय 2.5 वर्षे) या लहान चिमुकल्याचा गळा घोटून खून केल्याचा खुलासा तपासात झाला आहे.
गणेश वाघ व पत्नी पुष्पा हे दोघे मजुरीसाठी बाहेर गेले असताना त्यांची मुले घरात खेळत होती. याच वेळी शेजारी राहणाऱ्या महिलेने ईर्षा व रागातून जयदीपला उचलून नेले आणि पायवाटेजवळ त्याचा गळा आवळून त्याला ठार मारले. सुरुवातीला मुलगा बेशुद्ध पडल्याचे भासवत तो नैसर्गिक मृत्यू झाल्याचा आभास आरोपीने निर्माण केला.त्यानंतर मुलगा मरण पावल्याचे समजताच आई पुष्पा वाघ यांनी त्याला कळंब येथील रुग्णालयात नेले. तेथे तो मृत घोषित झाला आणि कुटुंबीयांनी त्याला गावातील स्मशानात पुरले होते.
घटनेची माहिती एका स्थानिक नागरिकाने नेरळ पोलिसांना दिल्यानंतर हा प्रकरणाचा खरा धागा सुटला. नेरळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शिवाजी ढवळे यांनी माहितीला अत्यंत गांभीर्याने घेत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीपासूनच मुलाच्या मृत्यूबाबत संशय बाळगणाऱ्या ढवळे यांनी तपासाची दिशा बदलणारे महत्त्वाचे निर्णय घेतले.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड तसेच रायगड पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनानुसार व कर्जत तहसीलदार धनंजय जाधव यांच्या परवानगीने पोलिसांनी मृतदेह जमिनीतून पुन्हा बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनात मुलाचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले.
यापूर्वीही आरोपीने एक दिवस अगोदर दुपारी फिर्यादीच्या चार वर्षांच्या मुलीला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो प्रयत्न फसला. दुसऱ्याच दिवशी तिने अडीच वर्षांच्या मुलाचा जीव घेतला.आरोपी महिलेला तीन मुले असून दोन जुळे दीड वर्षाचे असून एक मोठा मुलगा बहिणीला दत्तक दिलेला आहे.
महिलेची तपासात कबुली
पोलिसांनी केलेल्या काटेकोर तपासामुळे आरोपी जयवंता मुकणे हिच्याकडून अखेर गुन्ह्याची कबुली उघडकीस आली. तिच्या मुलांना फिर्यादीच्या मुलांकडून वारंवार त्रास दिला जात होता, या रागातून तिने हे भयावह पाऊल उचलल्याचे पोलिसांसमोर कबुली दिली आहे.नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांच्या वेगवान तपासाचे कौतुकया प्रकरणात नेरळ पोलिसांची चातुर्य, ढवळे यांची शंका आणि त्वरित कार्यवाही, तसेच अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाने खरे सत्य बाहेर आले आहे.
गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना असून पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक होत आहे.कर्जत तालुक्यात या घटनेने खळबळ उडाली असून आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात असून 17 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कस्टडी देण्यात आलेली आहे. पुढील तपास हा नेरळ पोलीस हा पोलीस निरिक्षक शिवाजी ढवळे हे करीत आहे