रायगड

Karjat Solanpada Dam Incident: सोलनपाडा डॅम परिसरात तरुणाचा मृत्यू; सांडव्यातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने दुर्घटना

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वडाळा येथील चार मित्र पावसाळी पर्यटनासाठी सोलनपाडा येथे आले होते.

पुढारी वृत्तसेवा

नेरळ: कर्जत तालुक्यातील सोलनपाडा डॅम परिसरात पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या मुंबईतील एका २४ वर्षीय तरुणाचा सांडव्यातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. २ ऑगस्ट) दुपारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वडाळा येथील चार मित्र पावसाळी पर्यटनासाठी सोलनपाडा येथे आले होते.

दुपारी सुमारे १.०० ते १.३० वाजण्याच्या दरम्यान हे सर्वजण डॅमच्या सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या खालच्या बाजूस पाण्यात उतरून आनंद घेत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. यामध्ये अरमान अब्दुल लतीफ (वय २४) हा तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.

घटनेची माहिती मिळताच गावातील पोलीस पाटील यांनी कशेळे आऊटपोस्ट पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली.

सुमारे दुपारी २.०० ते २.३० वाजण्याच्या दरम्यान डॅमच्या खालच्या बाजूस असलेल्या रस्त्यावरील पुलाच्या पहिल्या मोरीजवळ संबंधित तरुणाचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने बाहेर काढून कशेळे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

मृत अरमान अब्दुल लतीफ हा सध्या मुंबईतील वडाळा येथे वास्तव्यास असून त्याचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

या घटनेमुळे सोलनपाडा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पावसाळ्यात धरणे, सांडवे आणि धबधब्यांजवळ पर्यटन करताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, तसेच पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यास पाण्यात उतरू नये, असे आवाहन प्रशासन आणि स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT