कर्जत : हेमंत देशमुख
भेदरलेले पक्षी आकाशात घिरट्या मारत आपल्या निष्पाप पिल्लांचा शोध घेण्यासाठी आक्रोश करत आहेत... जंगलतोडीमुळे एका क्षणात नष्ट झालेला त्यांचा पूर्वापार चालत आलेला अधिवास आणि जमिनीवर कोसळून मृत्युमुखी पडलेली नवजात पिल्ले... हे मन हेलावून टाकणारे विदारक दृश्य सध्या कर्जत तालुक्यातील पाली ग्रामपंचायत हद्दीतील साय डोंगर भागात पाहायला मिळत आहे. टोरंट पॉवर कंपनीच्या प्रस्तावित भव्य वीज प्रकल्पासाठी वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अमानुष वृक्षतोडीमुळे हे निसर्गाचे तांडव घडत असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कर्जत तालुक्याची मूळ ओळखच एक निसर्गसंपन्न आणि आदिवासी बहुल तालुका म्हणून आहे. माथेरान आणि सह्याद्रीच्या उंच पर्वत रांगा, त्यात असणाऱ्या अत्यंत दुर्मिळ वनस्पती, विविध पशुपक्षी आणि निसर्गाचे वरदान यामुळे हा संपूर्ण तालुका पूर्वीपासूनच 'ग्रीन झोन' म्हणजेच हरित पट्टा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे.
साहजिकच त्यामुळे येथील घनदाट जंगल आणि त्यात वास्तव्यास असणारे जीवसृष्टीचे स्थान आजही अबाधित आहे. मात्र, टोरंट पॉवर कंपनीच्या प्रस्तावित वीज प्रकल्पासाठी येथील वनविभागाची तब्बल ६०० एकर समृद्ध जागा देण्यात आली आहे. या जागेवर प्रकल्प उभारण्यासाठी आता कंपनीकडून मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक कटरच्या साह्याने वृक्षतोड सुरू आहे. यामध्ये लहान-मोठ्या झाडांसह शतकोनावर्षे उभी असलेल्या महाकाय वृक्षांचाही समावेश आहे.
अन्नसाखळी खंडित अन् जीवांचा आकांत
या बेछूट जंगलतोडीमुळे पशुपक्ष्यांची हक्काची घरटी नष्ट होऊन ते पूर्णपणे उघड्यावर आले आहेत. झाडे कापल्याने घरट्यांमधील नवजात पिल्ले थेट जमिनीवर कोसळली असून त्या निष्पाप जिवांना हकनाक आपले प्राण गमवावे लागले आहेत.
२०० वर्षापूर्वीची नैसर्गिक जैवविविधता नष्ट हाेणार
भीमाशंकर-कर्जत येथील जंगलातील वृक्षतोडीचा प्रश्न पर्यावरणीय दृष्ट्या अतिशय गंभीर आहे. काही हजार झाडांची नुसती कत्तलच नाही, तर संपूर्ण परिसंस्था नष्ट होणार आहे. एक उत्कृष्ट जंगल परिसंस्था म्हणून वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांना खांडस मार्गे भीमाशंकरपर्यंत चालत जाऊन अनेकदा या जंगलाचा अभ्यास करण्याचा योग आला. येथील प्रत्येक झाड १०० ते २०० वर्षांपूर्वीचे असून ती एक स्वतंत्र परिसंस्था आहे.
प्रत्येक झाडाचा आधार घेऊन अनेक वेली आणि एपिफायट्स (Epiphytes) वाढत आहेत. अनेक प्रकारचे मॉस व नेचे वाढत आहेत. प्रत्येक झाड स्वतःची एक सूक्ष्म परिसंस्था तयार करते. त्यामुळेच त्यांच्या सावलीत इतर सायओफायट्स (Sciophytes - सावलीत वाढणाऱ्या वनस्पती) प्रकारातील झाडे, बुरशी आणि अळंबी वाढत असतात. हे सर्व सजीवांचे प्रकार एकमेकांना सहकार्य करत जगत असतात. अत्युच्च पातळीवरील सहजीवन त्यांच्यामध्ये दिसून येते.
वृक्षसंपदा
साग, ऐन, किंजळ, खैर, शिसम, धावडा, उंबर, औषधी हिरडा, बेहडा, रानआले, नेचे
दुर्मीळ पक्षी
कस्तूर (मलबारी शितीवाला / व्हिसलिंग स्कूलबॉय), स्वर्गीय नर्तक, मोर, महाधनेश, मलबारी धनेश, सर्प गरुड, कवड्या ,पांढऱ्या छातीचा खंड्या, पाणकोंबडी, छोटा पाणकावळा, रानपिंगळा, सुगरण
संरक्षित वन्यजीव
वन्यजीव संरक्षण कायद्याच्या 'अनुसूची १' अंतर्गत येणारा महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू, बिबट्या, रानअस्वल, पांगोलिन (खवले मांजर), भेकर, रानमांजर, माकडे आणि लंगूर यांचे हे हक्काचे घर आहे.
एवढेच नाही, तर अनेक झाडे निरनिराळ्या पक्ष्यांचे अधिवास असतात. त्यांनी घरटी या झाडांवर बांधल्यामुळे त्यांच्या अनेक पिढ्या येथून बाहेर पडलेल्या आहेत. अशा परिस्थितीत ही सर्व झाडे जर तोडली गेली, तर यांच्या अस्तित्वाचे काय? सर्व आधार, अधिवास आणि परिसंस्था पूर्णपणे नष्ट होण्याची भीती आहे. कोणत्याही प्रकल्पाला परवानगी देण्यापूर्वी त्या भौगोलिक परिस्थितीचा पर्यावरणीय अभ्यास केला जातो. संबंधितांची जाहीर सुनावणी घेतली जाते. या प्रकल्पाची अशी सुनावणी झाली असल्यास हे पर्यावरणीय प्रश्न चर्चेला आले नाहीत का? पर्यायी वृक्षलागवड करून पुन्हा ही परिसंस्था तयार होईल का? की जे गेले ते गेलेच?डाॅ.अनिल पाटील, ज्येष्ठ पर्यावरण व जैवविविधता तज्ज्ञ