Karjat Torrent Project Protest Pudhari
रायगड

Karjat Torrent Project Protest: कर्जतमध्ये टोरंटच्या प्रकल्पांविरोधात कॅण्डल मार्च; ३२ संघटना एकवटल्या

टोरंट, पोशिर,शिलार प्रकल्पांना विरोध; वृक्षतोडीच्या निषेधार्थ जनजागृती

पुढारी वृत्तसेवा

नेरळ: सह्याद्री पर्वतरांगांचे संरक्षण, जंगलसंपत्तीची जपणूक, नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन आणि स्थानिक नागरिकांच्या हक्कांसाठी कर्जतमध्ये रविवारी व्यापक जनजागृती मोहीम व कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले.

टोरंट कंपनीच्या सायडोंगर प्रकल्पासह पोशिर आणि शिलार प्रकल्पांना विरोध दर्शवत तसेच दसऱ्याच्या दिवशी सायडोंगर परिसरात झालेल्या वृक्षतोडीचा निषेध करण्यासाठी तब्बल ३२ राजकीय व सामाजिक संघटनांनी या उपक्रमाला पाठिंबा देत सहभाग नोंदवला.

त्यामुळे सह्याद्री संरक्षणाचा मुद्दा आता एका संघटनेपुरता मर्यादित न राहता व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप धारण करू लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कर्जत पोस्ट ऑफिसजवळ सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत सह्याद्री संरक्षण जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या माध्यमातून सह्याद्री पर्वतरांगांचे पर्यावरणीय महत्त्व, जंगलतोडीचे संभाव्य परिणाम, जलस्रोतांवरील संकट आणि प्रस्तावित प्रकल्पांमुळे स्थानिकांच्या जीवनावर होणारे परिणाम याबाबत नागरिकांत जागृती करण्यात आली. टोरंट, पोशिर आणि शिलार प्रकल्पांबाबत स्थानिक जनतेच्या भावना आणि आक्षेप शासनापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

सायंकाळी ५.३० वाजता कॅण्डल मार्चला सुरुवात झाली. छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर डेक्कन जिमखाना येथून कॅण्डल मार्चला प्रारंभ करण्यात आला.

तेथून कर्जत रेल्वे स्थानक परिसरातील जकात नाका मार्गे टिळक चौक येथे मार्च पोहोचला. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला पुष्पहार अर्पण करून कॅण्डल मार्चची सांगता झाली. हातात प्रज्वलित मेणबत्त्या घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी सह्याद्रीच्या संरक्षणाचा व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

या जनजागृती मोहिमेत कर्जत तालुका पर्यावरण बचाव संघर्ष समितीसह शिवसेना (उबाठा), काँग्रेस, मनसे, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (शप पक्ष), वंचित बहुजन आघाडी, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) व आजाद समाज पार्टी आदी पक्षांनी सहभाग घेतला.

याशिवाय आधार जनसेवा सामाजिक संस्था, जागृत कष्टकरी संघटना, भारतीय बौद्ध महासभा, कर्जत रेल्वे पॅसेंजर हक्क समिती, कर्जत शहर बचाव समिती, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, चलो साथी क्रांती करे, कर्जत तालुका सकल मराठा समाज, किसान क्रांती संघटना , कर्जत प्रेस क्लब, शिलार धरण विरोधी संघर्ष समिती, पोशिर धरण शेतकरी संघटना,आगरी समाज संघटना कर्जत, ग्राम संघर्ष समिती पाली तर्फे कोथळखलाटी, ऑल इंडिया पँथर सेना, सह्याद्री आदिवासी समाज संघटना व कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन आदी संघटनांनीही पाठिंबा दिला.

विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास नको!

सायडोंगर येथील टोरंट कंपनीच्या प्रस्तावित पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पामुळे जंगल, जैवविविधता, नैसर्गिक जलप्रवाह आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती पर्यावरणप्रेमी व ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

याशिवाय पोशिर आणि शिलार धरण प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या गावांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. विकासाच्या नावाखाली स्थानिकांचे नैसर्गिक साधनसंपत्तीवरील हक्क आणि पर्यावरणीय समतोल धोक्यात येऊ नये, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT