कर्जत:रेल्वे सुरक्षा बल पोस्ट कर्जत यांनी अवैध गुट खाव पान मसाला वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून सुमारे 2 लाख 715 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 21 मार्च रोजी सकाळी कर्जत रेल्वे स्थानकावर करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरपीएफचे कर्मचारी बाबुशा इंगोले व शेषराव खिल्लारे हे 21 मार्च रोजी सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत ड्युटीवर होते. यावेळी ट्रेन क्रमांक 22944 डाउन इंदौर-दौंड एक्सप्रेस कर्जत रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर सकाळी 7:12 वाजता दाखल झाली. ट्रेनची नियमित तपासणी सुरू असताना एस-2 डब्यातून दोन व्यक्ती मोठ्या 4 ते 5 बॅगांसह संशयास्पद हालचाली करत उतरताना दिसले. संशय आल्याने त्यांची चौकशी करण्यात आली, मात्र त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर दोघांना आरपीएफ पोस्ट कर्जत येथे आणण्यात आले.
सदर मुद्देमाल पंचनामा करून आरपीएफच्या ताब्यात घेण्यात आला. तसेच आरोपींची कर्जत येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे फूड इन्स्पेक्टर प्रशांत शिंदे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्या सूचनेनुसार आरोपी व जप्त माल जीआरपी कर्जत यांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी जीआरपी कर्जत यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.या कारवाईत आरपीएफचे कर्मचारी बाबुशा इंगोले व शेषराव खिल्लारे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
उपनिरीक्षक प्रतिभा साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे गोलू कुमार राजेंद्र कुमार (वय 23, रा. कामोठे, पनवेल), अंकुश कुमार हरी कुमार (वय 21, रा. कामोठे, पनवेल) अशी सांगितली. त्यानंतर त्यांच्या पाच बॅगांची तपासणी केली असता त्यामध्ये विविध प्रकारचा गुटखा, पान मसाला व तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आला. यामध्ये विमल, राजश्री, रजनीगंधा, तुलसी जर्दा, तंबाखू आदी ब्रँडचा समावेश असून एकूण दोन लाख 715 किंमतीचा माल जप्त करण्यात आला.