Pali Bhutivali dam project Pudhari
रायगड

Pali Bhutivali dam project: कोट्यवधींचा खर्च, तरी पाली-भुतिवली धरण अपूर्णच; पाली-भुतिवली प्रकल्पावर प्रश्नचिन्ह

कालवे अतिक्रमणाच्या विळख्यात

पुढारी वृत्तसेवा

कर्जत: कर्जत तालुक्यातील पाली-भुतिवली धरण प्रकल्पावर गेल्या तीन दशकांत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला, मात्र आजही हा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवून परिसर सुजलाम-सुफलाम करण्याचे स्वप्न दाखवण्यात आले; पण प्रत्यक्षात कालवे उद्ध्वस्त झाले, काही ठिकाणी अतिक्रमणे झाली आणि शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सुमारे 30 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या प्रकल्पाचा उद्देश शेती आणि नागरिकांना पाणीपुरवठा करणे हा होता.1994-95 मध्ये सुमारे तीन कोटी रुपयांच्या निविदांपासून सुरू झालेला खर्च पुढे जवळपास 97 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते. धरणाच्या मुख्य संरचनेसह सॅडल डॅम क्रमांक 2 आणि 3 चे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले असले, तरी सॅडल डॅम क्रमांक 1 अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकल्पाचे उद्दिष्ट साध्य झालेले नाही.

या धरणातून सुमारे 20 गावांतील शेतीला पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले होते. 2007 मध्ये जवळपास नऊ कोटी रुपये खर्च करून सिंचन कालवे बांधण्यात आले. यासाठी अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनी दिल्या. काहींना अद्याप योग्य मोबदला मिळालेला नाही. तरीही दुबार पीक घेता येईल, शेती बहरून येईल या आशेने शेतकऱ्यांनी शासनाला सहकार्य केले. मात्र कालव्यांतून नियमित पाणी सोडले गेलेच नाही.

आज परिस्थिती अशी आहे की अनेक कालवे मोडकळीस आले आहेत. काही ठिकाणी अतिक्रमण आणि बांधकामांमुळे कालव्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

विशेष म्हणजे, धरणात पर्यटनासाठी बोटिंगची व्यवस्था करण्यात आली असली तरी आजूबाजूच्या ग्रामपंचायतींच्या पाणी योजनांना किंवा शेतकऱ्यांच्या सिंचनाला या जलसाठ्याचा अपेक्षित लाभ मिळालेला नाही. त्यामुळे “शेतकऱ्यांसाठी उभारलेला प्रकल्प नेमका कोणाच्या उपयोगाचा?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.दरम्यान, 25 मार्च 2025 रोजी पाली-भुतिवली धरणग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने कर्जत प्रशासकीय भवनासमोर साखळी उपोषण सुरू केले होते.

सिंचनासाठी राखीव असलेले पाणी तळोजा औद्योगिक क्षेत्राकडे वळविण्याच्या हालचालींना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला. विस्थापित कुटुंबांना न्याय, योग्य मोबदला आणि प्रकल्पाचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती.या प्रकल्पामुळे अनेक गावे बाधित झाली, काहींना विस्थापनाचा सामना करावा लागला; परंतु अपेक्षित मोबदला, पुनर्वसन आणि सिंचनाचा लाभ अद्यापही अपूर्णच आहे.

परिणामी, कर्जत तालुक्यातील इतर प्रस्तावित धरण प्रकल्पांविरोधातील स्थानिकांचा विरोध अधिक तीव्र होत आहे. पाली-भुतिवली धरणावर खर्च झालेल्या प्रचंड निधीचा हिशोब, अपूर्ण कामांची जबाबदारी आणि सिंचन योजनेचे भवितव्य याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

“कालवे 2007 मध्ये बांधण्यात आले. त्यानंतर नियमित देखभाल-दुरुस्ती झाली नाही. कालव्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करणाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अतिक्रमण आणि उत्खननाबाबत नेरळ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. सॅडल डॅम क्रमांक 1 चे काम अद्याप बाकी आहे.”
- संजिवकुमार शिंदे, उपविभागीय अभियंता, लघुपाटबंधारे उपविभाग क्र.1 रायगड,जलसंपदा विभा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT