नेरळ : कर्जत नगरपरिषद कर विभागाने मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात कठोर भूमिका घेत जप्तीची कारवाई सुरू केली आहे. थकीत कर न भरल्यामुळे कर्जत येथील 'राजन्होवा' या नावाने चालणारे सिनेमागृह बुधवारी दि. १८ मार्च २०२६ रोजी सील करण्यात आली आहे. सदर कारवाई ही मोहनराज ताटीपल्ली रा. कर्जत यांच्या मालकीच्या मालमत्तेवर करण्यात आली आहे.
संबंधित मालमत्तेवर मोठ्या प्रमाणात कर थकबाकी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कर विभाग प्रमुख शशांक शांताराम तळवटकर व त्यांच्या पथकाने प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन नोटीस चिटकवून सिनेमागृहाला टाळे ठोकले आहे.
नगरपरिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ताटीपल्ली यांच्या विविध मालमत्तांवर अनुक्रमे १५,७२,८१७, १५,३०,३२४, ३,७४,३२९ आणि १६,७२,०९० अशी थकबाकी असून, एकूण थकीत रक्कम ५१,४९,५६० इतकी आहे.
एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीतील मालमत्ता कर व इतर कर न भरल्यामुळे ही थकबाकी निर्माण झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ही कारवाई महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम १५२ अंतर्गत करण्यात आली असून, संबंधितांना यापूर्वीही नोटिसा देण्यात आल्या होत्या.
यापुढेही थकबाकीदारांविरोधात अशीच कठोर कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचा इशारा नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे. तसेच कर थकबाकीदारांनी तात्काळ थकबाकी भरून कारवाई टाळावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
या कारवाईदरम्यान कर विभाग प्रमुख शशांक शांताराम तळवटकर, सहाय्यक कर निरीक्षक राहुल महाडिक, दीपिका सराई, शीतल सावंत, शिपाई रुपेश पाटील आदी उपस्थित होते.