accident file photo
रायगड

Karjat Murbad Accident News: कर्जत–मुरबाड महामार्गावर हिट अँड रनमध्ये वृद्ध महिलेचा मृत्यू; महिनाभरात महामार्गावरील तिसरा बळी

कर्जत-मुरबाड महामार्गावरील लाखरण परिसरात भरधाव कारने वृद्ध पादचारी महिलेला धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक फरार असून कर्जत पोलिसांकडून सीसीटीव्ही आणि वाहनांची माहिती तपासली जात आहे.

पुढारी वृत्तसेवा

नेरळ: कर्जत–मुरबाड महामार्गावरील लाखरण परिसरात भरधाव कारने एका वृद्ध पादचारी महिलेला धडक देऊन वाहनचालक फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, गेल्या महिनाभरात या महामार्गावरील हा तिसरा बळी ठरला आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.

प्राथमिक तपासानुसार ही घटना पहाटेच्या सुमारास घडली असावी. मात्र सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिकांना रस्त्यालगत मृतदेह आढळून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस आणि महिला पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. अपघातानंतर फरार झालेल्या कारचा शोध घेण्यासाठी पहाटे या मार्गावरून गेलेल्या वाहनांची माहिती आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.

या महामार्गावर सलग होत असलेल्या जीवघेण्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या मार्गावर कायमस्वरूपी वेगनियंत्रण, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि पादचारी सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.या प्रकरणी कर्जत पोलीसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT