नेरळ : आनंद सकपाळ
कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदावर नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी जाहीर झाले आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांच्या आशेवर पाणी पडले आहे. कर्जतमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या तयारीची जोरदार घौडदौड पाहवयास मिळत आहे. त्यांची लढत महायुतीच्याच शिवसेनेसोबत होणार आहे.आ.महेंद्र थोरवे यांना शह देण्यासाठी अजित पवार गटाने आतापासून महाआघाडीतील घटक पक्षांशी जवळीक वाढविली आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी ( शप ) यांच्यासमवेत गुप्त बैठका होऊ लागलेल्या आहेत. नगराध्यक्षपद आता ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्याने या नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण असतील याबाबत सर्वच राजकीय पक्षांनी आपापली नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत.
महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षातूऩ किसान मोर्चाचे पदाधिकारी सुनिल गोगटे हे इच्छुक असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. शिवसेना शिंदे गटातर्फे माजी नगरसेवक संकेत भासे यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून नांव पुढे येत होते. त्यांचा विविध समस्या सोडविण्यासाठी असलेला सक्रीय सहभाग हा पहावयास मिळत होतो.मात्र नगरध्यक्षपदाचे आरक्षण ओबीसी महिलेसाठी राखीव झाले अन ज्यांनी नगराध्यक्षपदासाठी तयारी सुरू केली होती त्यांचा मात्र हिरमोड झाला.
मात्र निवडणूक आयोगाकडून नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाच्या सोडतीमध्ये कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी जाहीर झाले असल्याने, कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीच्या निवडणूकीची एक प्रकारे तयारीत असलेल्या राज्यकीय पक्षातील पुरूष प्रवर्गातील काही उमेदवारांसह दावेदारी करणार्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या आशेवर मात्र विरजन पडल्याचे चित्र समोर येत आहे.
भाजपमध्ये गटातटाचे राजकारण
महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजपमध्येही गटातटाचे राजकारण सुरू झालेले आहे. एक गट एकला चलोचा व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीच्या दावेदारीच्या मागणीच्या पावित्र्यात आहे तर , एक गट हा महायुतीमधील दुसरा घटक पक्ष शिवसेना शिंदे गटाशी युतीच्या व नगराध्यक्ष पदाच्या दावेदारीत नसल्याचे चित्र समोर येत आहे. तशी कर्जत तालुक्यात जोरदार चर्चा देखील सुरू आहे.