Karjat Water Pipeline Leak Pudhari
रायगड

Karjat Water Pipeline Leak: कर्जत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती

वारंवार खंडित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त; ठोस उपाययोजनांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

कर्जत: कर्जत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. खेदाची बाब म्हणजे मुख्य जलवाहिनी फुटण्याची तसेच गळती होण्याची घटना वारंवार होत असल्याने नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. परिणामी वारंवार खंडित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

कर्जत तालुक्यातील पेज नदीवर आधारित पाणी योजना असून वंजारवाडी येथून कर्जत शहराकडे मुख्य जलवाहिनी आणली गेली आहे. आजवर अनेक वेळा हे मुख्य जलवाहिनी फुटली आहे आणि गळती होत आहे. दर वेळेस या जलवाहिनीची तात्पुरती दुरुस्ती करण्यात येते त्यामुळे हे तात्पुरती केलेले मलमपट्टी काही काळातच पुन्हा जलवाहिनी फुटण्याचे तथा गळण्याचे कारण बनत आहे.

मुख्य जलवाहिनी गळती झाल्यानंतर त्या ठिकाणची पाहणी नगराध्यक्षा पुष्पा दगडे यांनी केली. यावेळी नगरसेवक अशोक राऊत, मानसी कानिटकर तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारीही उपस्थित होते.

जलवाहिनी फुटली की लगेच दुसऱ्या दिवशी पाणी येणार नाही असा संदेश सोशल मीडियावर पाठवून नगरपरिषद आपली जबाबदारी झटकत आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे. पण काम कधी पूर्ण होणार त्यानंतर स्वच्छ आणि पुरेशा दाबाने कधी किती वाजता पाणी येणार का याबाबत नागरिकांना सूचना दिल्या जात नाही. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सततची गळती, तुटणारी लाईन

कर्जत शहराला पाणी पुरवणाऱ्या साठवण टाकीपासून ते वितरण लाईनपर्यंत गळतीचे प्रमाण वाढले आहे. वारंवार लाईन फुटल्याने दुरुस्तीचं काम सुरू असताना संपूर्ण पुरवठा खंडित करावा लागतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी पाणी येण्याची वेळ पुढे ढकलली जाते. 'मेसेज येतो पाणी बंद, पण कधी येणार याचा काही नेम नाही,' अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

वाढलेली पाण्याची मागणी

कर्जतची व्याप्ती झपाट्याने वाढत असून 'तिसरी मुंबई' म्हणून घोषित झालेल्या या शहरात नवीन वसाहती, गृहप्रकल्प आणि रहिवासी झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली असताना, वितरण व्यवस्था मात्र जुन्या आणि जीर्ण पाईपलाईनवरच चालते आहे. परिणामी पाण्याचा दाब वाढला की लाईन फुटते, दुरुस्ती होते, आणि पुन्हा काही दिवसांनी तेच चक्र सुरू होते.

लोकप्रतिनिधींकडून केवळ पाहणी?

गळती झाल्यावर नगराध्यक्षा आणि नगरसेवक घटनास्थळी येतात, पाहणी करतात, फोटो काढतात. पण पाणीपुरवठ्याच्या मूलभूत प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय योजना करत नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT