Raigad News Pudhari
रायगड

Raigad News: डिकसळ-पाली येथे दरड कोसळण्याची भीती

स्थलांतरित आदिवासी कुटुंबांची दयनीय अवस्था, प्रशासनाविरोधात संताप

पुढारी वृत्तसेवा

नेरळ: कर्जत तालुक्यातील डिकसळ–पाली परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून, गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण गाव अंधारात आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने सात ते आठ आदिवासी कुटुंबांना पाली येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत तात्पुरते स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, या निवारा केंद्रातील अत्यंत दयनीय व्यवस्थेमुळे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ज्या शाळेत स्थलांतरित कुटुंबांची व्यवस्था करण्यात आली आहे, त्या शाळेचे छतच ठिकठिकाणी गळत असून वर्गखोल्यांमध्ये पाणी व चिखल साचला आहे. पिण्याच्या पाण्याची, जेवणाची आणि मूलभूत सुविधांची कोणतीही व्यवस्था नसल्याने महिलांसह लहान मुलांचे मोठे हाल होत आहेत.

विशेष म्हणजे, प्रशासन दिवसभर या कुटुंबांना त्यांच्या घरी राहण्यास सांगते आणि केवळ रात्रीच्या वेळी शाळेत झोपण्यासाठी येण्याच्या सूचना देते. सुरुवातीला ग्रामपंचायतीकडून एक दिवस वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती.

मात्र त्यानंतर महिलांना लहान मुलांना घेऊन रात्रीच्या अंधारात चिखलातून पायपीट करत शाळेत जावे लागत असल्याची व्यथा त्यांनी मांडली. गावात गेल्या तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने मोबाईल चार्ज करता येत नाही.

त्यामुळे बाहेरील जगाशी संपर्क तुटला असून, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी कोणाशी संपर्क साधायचा, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला आहे. निवारा केंद्रावर ग्रामपंचायतीचा कोणताही कर्मचारीही उपस्थित नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT