नेरळ: कर्जत तालुक्यातील बहुचर्चित आणि कोट्यवधी रुपयांच्या जमीन घोटाळा प्रकरणातील १६ महिन्यांपासून फरार असलेला मुख्य आरोपी लालचंद घरत याला अखेर कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. ८ मार्च २०२५ रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर घरत सतत ठिकाणे बदलत पोलिसांना चकवा देत होता. अखेर ३० जुलै रोजी त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
या आरोपीचा जामीन अर्ज १३ जुलै २०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतरही तो फरारच होता. अखेर आरोपी न्यायालयात हजर झाल्यानंतर कर्जत पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात देण्याची मागणी केली.
न्यायालयाने ती मान्य करत आरोपीला ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या प्रकरणातील आणखी महत्त्वाची माहिती आणि इतर आरोपींबाबत धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तपासानुसार, लालचंद घरत, चंद्रकांत पाटील, रवींद्र कोंडीलकर आणि इतर आरोपींनी संगनमत करून मूळ जमीनमालकांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली. यासाठी रवींद्र देशपांडे याला मृत जमीनमालक अस्पी रुस्तमजी बलसारा यांच्या नावाने उभे करण्यात आले.
तसेच लक्ष्मी गवडा, आशा स्टीफन स्वामी आणि गणेश गवडा यांना संबंधित कुटुंबीय म्हणून खोट्या पद्धतीने सादर करण्यात आल्याचा आरोप आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे शिंगढोळ, कशेळे आणि कोंठीबे येथील एकूण ३५.५४ एकर जमीन स्वतःच्या नावावर करून त्यापैकी १९.७७५ एकर जमीन विविध खरेदीखतांद्वारे इतरांना विकण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.