नेरळ : पुढारी वृत्तसेवा
कर्जत तालुक्यातील मौजे बोरगाव परिसरातील 10 एकर जमिनीचा बेकायदेशी पध्दतीने जमीन घोटाळा उघड झाला आहे. चक्क मृत व्यक्तीला जिवंत दाखवून जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार झाल्याची घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे. या बेकायदेशीर जमिनीच्या व्यवहारा संदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असुन, पुढील तपास हा नेरळ पोलीस करीत आहे.
सध्या शासनाकडून कर्जत तालुक्यातील पोशीरी नदीवरील प्रस्तावित केलेल्या धरणामुळे सध्या बोरगाव परिसरातील जमिनीच्या वाढलेल्या किमती संदर्भातील पार्श्वभूमी पहाता या परिसरातील जमिन विक्री खरेदीच्या व्यवहारा वेग आला असताना, एक मोठा बेकायदेशीर जमीन घोटाळा झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
मौजे बोरगाव येथील येथील सर्वे नंबर 4/ 9, 18/7, 18/4ब आणि 18/4अ अशी एकूण सुमारे दहा एकर जमीन व्यवहारात फिर्यादीच्या म्हणण्यानुसार सदर जमिनीचे मालक हे सन. 2007 साली मृत झाले असताना, आरोपींनी त्यांच्या नावाने बनावट कागदपत्रानुसार सन 2008 व 2009 दरम्यान विक्री परवाना कुल मुखत्यार पत्र, साठेकर व करारनामा तयार करून, या कागदपत्रांच्या आधारे जमीनचा बेकायदेशीर रित्या दुसऱ्याच्या नावे वळविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात लक्ष्मण पाटील, चंद्रकांत पाटील व रघुनाथ पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी स्वराज सिंग याचे नाव समोर आले आहे. मुंबई येथील राहणार शर्मा, बळीराम शंकर पाटील व अमोल अनंत देशमुख राहणार बोरगाव,तालुका कर्जत यांचाही सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. व सदर जमीन ही अंधेरी मुंबई येथील काही व्यक्तींची नावे करण्यात आल्याचे ही तपासामधून येत आहे.
या बेकायदेशीर जमीन विक्री खरेदी संदर्भात न्यायालयाच्या आदेशानुसार सदर प्रकरण नोंदवण्यात आले आहे. फसवणूक व बेकायदेशीर कागदपत्राच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.