Karjat toilet issue pudhari photo
रायगड

Karjat toilet issue : कर्जत प्रशासकीय भवन अस्वच्छतेच्या विळख्यात

शौचालयाची अवस्था दयनीय; कर्मचारी, नागरिक दुर्गंधीने हैराण

पुढारी वृत्तसेवा

कर्जत : कर्जत शहरात नव्याने उभारलेल्या प्रशासकीय भावनातील शौचालयांची अत्यंत दुरवस्था झाली असून दुर्गंधी पसरली आहे या शौचालय सेतू केंद्राचे कार्यालय असल्याने या कार्यालयात काम करणारे कर्मचारी आणि कामासाठी येणारे नागरिक यांना या दुर्गंधीमुळे नाक मुठीत धरून बसण्याची वेळ आली आहे. तूट फूट झालेल्या कमोड तसेच अस्वच्छते मुळे या शौचालयांचा नागरिकांना वापर करता येत नाही यामुळे त्यांची गैरसोय होत आहे.

शहरातील सर्व शासकीय कार्यालय एकाच छताखाली यावी या उद्देशाने शहराच्या मध्यभागी करोडो रुपये खर्च करून भव्य प्रशासकीय भवन उभारण्यात आले. परंतु येथे असणाऱ्या शौचालयांची योग्य देखभाल दुरुस्ती ठेवण्यात आलेली नसल्याने त्यांची दुरावस्था झाली आहे.

तहसील कार्यालयाच्या आवारातच असलेले सेतू सुविधा केंद्र शौचालयाच्या अगदी जवळ आहे. शौचालयाची स्वच्छता न झाल्याने आणि निचरा व्यवस्थेतील बिघाडामुळे तेथून कायमस्वरूपी दुर्गंधी येत असते.बेसिंग, कमोड आणि दरवाजा तुटलेल्या अवस्थेत आहे .

या दुर्गंधीमुळे सेतू केंद्रात दाखले, प्रमाणपत्रे काढण्यासाठी तासनतास थांबणाऱ्या नागरिकांना आणि तेथील कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक महिला आणि ज्येष्ठ नागरिक या वासामुळे चक्कर येणे, मळमळणे अशा समस्या निर्माण होत आहे .

ग्रामीण भागातून तसेच दूरवरून विविध कामांसाठी नागरिक येथे येतात. त्यांना जर वॉशरुममध्ये जावे लागले तर आतली घाण आणि दुर्गंधी बघून ते तिथून बाहेर पडतात आणि अन्य ठिकाणी शौचालय शोधत भटकतात.याचा सर्वात जास्त फटका गरोदर महिलांना बसत आहे. लांबून आलेल्या गरोदर महिलांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते.

शौचालयाची अशी अवस्था पाहून त्या जाण्यास घाबरतात. "इथे इन्फेक्शन झाले तर बाळाच्या जीवाला धोका होईल" या भीतीने अनेक महिला पोट धरून तसेच बसतात, पण शौचालयाला जात नाहीत. ही बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे.

स्वच्छतेची वाताहात

सरकारने इमारत कितीही मोठी केली तरी स्वच्छतेचे काय?

शौचालयाजवळच जर सेतू केंद्र असेल आणि तिथेच एवढी दुर्गंधी असेल तर आम्ही काय करायचे? नाक दाबून फॉर्म भरावे लागतात" अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली."प्रशासकीय इमारत नावापुरती भव्य आहे. पण मूलभूत स्वच्छताच जर नसेल तर या इमारतीला काय अर्थ?" असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. स्वच्छ भारत अभियान आणि शासकीय कार्यालयांची स्वच्छता यावर दररोज भाषणे होतात. मात्र कर्जत तहसीलसारख्या महत्वाच्या कार्यालयातच अशी अवस्था असेल तर नागरिकांनी कुठे जायचे, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT