Karjat AC toilet issue Pudhari
रायगड

Karjat AC toilet issue: कर्जतचे एसी शौचालय वर्षभरातच बंद; लाखो रुपये गेले वाया

नागरिकांना अक्षरशः “उल्लू” बनवण्यात आल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

पुढारी वृत्तसेवा

कर्जत: कर्जत शहरातील भिसेगाव येथे रेल्वे स्थानक जवळील बसथांब्याजवळ जुलै 2025 मध्ये मोठ्या थाटामाटात उद्घाटन पार पडलेले वातानुकूलित (एसी) शौचालय सध्या बंद अवस्थेत असून, नागरिकांना अक्षरशः “उल्लू” बनवण्यात आल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च करून महिलांसाठी उभारलेली ही सुविधा प्रत्यक्षात मात्र वापरात नसल्याने निधी वाया गेला का, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, बसची वाट पाहणाऱ्या महिला व प्रवाशांना सावलीसाठी असलेले शेड काढून टाकण्यात आले आहे. परिणामी, एका बाजूला बंद एसी शौचालय आणि दुसऱ्या बाजूला उन्हात उभे असलेले प्रवासी, असे विचित्र चित्र येथे पाहायला मिळत आहे.

महिलांसाठी एसी शौचालय उभारले, पण उभे राहण्यासाठी साधे शेडही नाही, हा प्रशासनाचा विरोधाभास स्पष्ट दिसतो. स्थानिकांच्या मते, हा प्रकल्प केवळ कागदोपत्री विकास दाखवण्यासाठी राबवण्यात आला असून, ठेकेदारांना फायदा करून देण्याचा प्रकार आहे. मूलभूत गरजा बाजूला ठेवून अनावश्यक कामांवर भर दिला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

उद्घाटनानंतर वर्षभर बंद असलेले हे शौचालय सुरू कधी होणार आणि प्रवाशांना सावलीची सोय कधी मिळणार? येथे महिला पुरुष दोन्हींसाठी शौचालय कधी होणार? असा सवाल केला जात आहे. सध्या तरी भिसेगावमध्ये “विकास” च्या नावाखाली नागरिकांना “उल्लू“ बनवण्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

नगरपालिकेने जबाबदारी झटकली

नगरपरिषद प्रशासन जबाबदारी झटकत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवत असले, तरी प्रवाशांसाठी निवारा शेड, पाणपोई व स्वच्छतागृह उभारणे ही स्थानिक प्रशासनाचीच जबाबदारी असल्याची चर्चा आहे. याबाबत उपअभियंता राहुल देवांग यांनी “स्थितीची माहिती घेऊन आवश्यक कार्यवाही करू,” असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT