

अलिबाग: रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे घडलेल्या 22 वर्षीय युवतीच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणातील आरोपीला अखेर पाच दिवसांच्या शोध मोहिमेनंतर रायगड पोलिसांनी नवी मुंबई येथून अटक केली आहे. अनिस मोहम्मदखान मालदार (वय 38, रा. लांजा जि. रत्नागिरी ) असे या आरोपीचे नाव आहे. अलिबागच्या जिल्हा सत्र न्यायालयाने 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याने या युवतीची का हत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
लोणेरे येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेत विशाखा (नाव बदलेले, वय 22) हिचा मृतदेह मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये आढळून आला होता. प्राथमिक तपासात आरोपी अनिस मोहम्मदखान मालदार (वय 38, रा. लांजा जि. रत्नागिरी ) याने तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्याचे समोर आले आहे.
आरोपीने तरुणीचे हात-पाय बांधून कोयत्याने वार करत हत्या केली. फॉरेन्सिक अहवालानुसार मृत्यूपूर्वी तरुणीला अमानुष शारीरिक छळ सहन करावा लागल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच हा आरोपी सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगून आल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 103(1) (हत्या) व 64 (बलात्कार) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.