Karanja Port Pudhari
रायगड

Karanja Port: उरणच्या करंजा बंदरात हजारो तारली माशांच्या समुद्राबाहेर उड्या; नागरिकांची गर्दी

दोन ते तीन तास सुरू होता अनोखा प्रकार; डॉल्फिन किंवा छोट्या शार्कच्या शिकारीमुळे मासे उड्या मारत असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

खांदा कॉलनी: उरणमधील करंजा बंदराच्या धक्क्यावर गुरुवारी (दि. २०) रात्री एक अत्यंत अनोखी आणि विस्मयकारक घटना घडली. समुद्रातील हजारो तारली माशांनी अचानक पाण्याबाहेर उड्या मारण्यास सुरुवात केली.

हा प्रकार काही मिनिटांपुरता मर्यादित न राहता तब्बल दोन ते तीन तास सुरू होता. मासे हवेत झेप घेऊन थेट धक्क्याच्या काठावर आणि जमिनीवर येऊन पडत असल्याने संपूर्ण परिसरात माशांचा मोठा सडा पडला होता.

रात्रीच्या अंधारात समुद्राच्या पृष्ठभागावर उडणारे मासे पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी धक्क्यावर मोठी गर्दी केली होती. समुद्रातून एकाच वेळी मोठ्या संख्येने मासे बाहेर येत असल्याचे दृश्य अत्यंत लक्षवेधी होते. अनेक तास हा प्रकार सुरू राहिल्याने अनुभवी कोळी बांधवांसह सामान्य नागरिकांमध्येही मोठे आश्चर्य व्यक्त केले जात होते.

अनेकांनी हा दुर्मीळ प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून, त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या घटनेमागचे नेमके शास्त्रीय कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता, तापमान आणि ऑक्सिजनची पातळी तपासण्याची तातडीची गरज व्यक्त होत आहे.

मत्स्य व्यवसाय विभाग आणि पर्यावरण विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी व यामागील सत्य समोर आणावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. समुद्राच्या पोटात नेमके काय घडतेय आणि हे वाढत्या प्रदूषणाचे धोक्याचे संकेत तर नाहीत ना, या चर्चेला करंजा परिसरात सध्या उधाण आले आहे.

डॉल्फिन आणि छोटे शार्क मासे या सारख्या भक्षक माशांची शिकार हेच यामागचे मुख्य कारण असण्याची ९० टक्के शक्यता आहे. तारली मासे हे समुद्रात मोठ्या समुहाने वावरत असतात. डॉल्फिन वा छोटे शार्क आपली शिकार एका कोपऱ्यात जमा करून तारली सारख्या लहान माशांना किनाऱ्याच्या उथळ पाण्याकडे ढकलतात. तिथे पाणी उथळ असले तरी सस्तन प्राणी असल्याने डॉल्फिन सहज जिवंत राहून शिकार करू शकतात. डॉल्फिन व मोठे मासे जेव्हा तारली माशांच्या थव्यावर हल्ला करतात, तेव्हा जीव वाचवण्यासाठी हे मासे पाण्याच्या पृष्ठभागावर वेगाने पोहत येतात आणि घाबरून हवेत उड्या मारतात.
-डॉ. स्वप्नजा मोहिते, मत्स्यजीव शास्त्रज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT