पनवेल: कामोठे सेक्टर १० परिसरात एका भटक्या कुत्र्याने अक्षरशः दहशत माजवत सुमारे दहा नागरिकांवर हल्ला चढविला. या थरारक घटनेत कुत्र्याने एका वृद्ध महिलेच्या डोळ्याजवळील मांसाचा लचका कुत्र्याने तोडला, तर लहान मुलांना वाचवण्यासाठी धावलेले ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिक कृष्णा म्हात्रे यांच्या हाताचाही चावा घेतला.
त्यासोबत एका सहा वर्षीय चिमुरड्याच्या गालाला चावा घेतल्याची घटना घडली आहे. या सलग हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी पनवेल महापालिकेकडे तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाचे कामोठे शहर प्रमुख राकेश गोवारी यांनी केली आहे.
भटक्या कुत्र्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करत चावा घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी काही लहान मुलेही त्या परिसरातून जात होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिक कृष्णा म्हात्रे यांनी मोठे धाडस दाखवत मुलांना कुत्र्याच्या हल्ल्यापासून सुरक्षित बाजूला केले.
मात्र, या दरम्यान कुत्र्याने त्यांच्या हाताचा चावा घेतल्याने ते जखमी झाले. याचवेळी या कामोठे सेक्टर १० येथून जाणाऱ्या एका आजीवर कुत्र्याने हल्ला चढवला. यात कुत्र्याने या आजीच्या उजव्या डोळ्याचा लचका तोडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. तसेच एका चिमुरड्याच्या गालाचा चावा घेतल्याची घटनाही घडली आहे. जवळपास दहा नागरिक या हल्ल्यात जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून वावरताना धास्ती वाटत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. कामोठ्यात यापूर्वीही अश्याच भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुरडे जखमी झाले होते. जवळपास तीन ते चार घटना यापूर्वी घडल्या आहेत.
दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) कामोठे शहर प्रमुख राकेश गोवारी यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पनवेल महापालिकेने संबंधित भटक्या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कामोठे परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वारंवार समोर येत असून, यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे पनवेल मनपाने प्रभावी उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
कुत्र्याला पकडले
या घटनेची माहिती मिळताच मनपाच्या आरोग्य विभागाने तातडीने कारवाई करत पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर चावा घेणाऱ्या एका कुत्र्याला ताब्यात घेतले. त्यामुळे कामोठे करांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.