

मुंबई: एचडीएफसी इन्शुरन्स हेल्प डेस्कमधून बोलत असल्याची बतावणी करून ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा गोवंडी पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज परिसरातील तीन कॉल सेंटरवर धाड टाकून १२ आरोपींना अटक करण्यात आली.
आरोपींकडून १७ लाख १८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तपासात आतापर्यंत ७८ लाखांहून अधिक रकमेच्या फसवणुकीचे धागेदोरे समोर आले आहेत.
या प्रकरणातील तक्रारदाराला एचडीएफसी इन्शुरन्स हेल्प डेस्कमधून बोलत असल्याचे सांगून विविध शुल्कांच्या नावाखाली टप्प्याटप्प्याने पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले. पैसे भरूनही कोणतीही सेवा न मिळाल्याने त्यांनी गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला. त्यानंतर गडहिंग्लज येथील तीन वेगवेगळ्या कॉल सेंटरवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत १२ आरोपींना अटक करण्यात आली.
आरोपींकडून २१ संगणक, ५७ लॅपटॉप, १५ मोबाईल फोन, ३ राऊटर, १५ सिमकार्ड तसेच ऑनलाइन फसवणुकीसाठी वापरले जाणारे अन्य साहित्य जप्त करण्यात आले.
प्राथमिक तपासात आरोपी बनावट इन्शुरन्स हेल्प डेस्कच्या नावाने ग्राहकांशी संपर्क साधत असल्याचे निष्पन्न झाले आहे. कर्ज, विमा किंवा आर्थिक लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून विविध शुल्कांच्या नावाखाली पैसे उकळल्यानंतर ग्राहकांशी संपर्क तोडण्याची त्यांची कार्यपद्धती होती. या टोळीकडून इतर नागरिकांचीही फसवणूक झाल्याची शक्यता असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे.
दरम्यान अश्या प्रकारे कारवाई होत असल्याने संबंधीतांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गोवंडी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
७८ लाखांहून अधिक फसवणुकीचा तपास
इन्शुरन्स कंपनीच्या नावाने आलेल्या अनोळखी फोनवर त्वरित विश्वास ठेवू नका.
बँक खाते, डेबिट-क्रेडिट कार्ड, ओटीपी किंवा इतर गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका.
कोणतेही शुल्क भरण्यापूर्वी संबंधित कंपनीच्या अधिकृत हेल्पलाइनवर माहितीची खातरजमा करा.
संशयास्पद व्यवहार झाल्यास तातडीने सायबर हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा