पनवेल : कामोठे सेक्टर २२ येथील भूखंड क्रमांक ७३ व ७४ वर उभारण्यात आलेल्या ‘एल. के. विवांता’ इमारतीमधील विनापरवानगी बांधण्यात आलेल्या अनधिकृत चार मजल्यावर पनवेल महापालिकेमार्फत तोडक कारवाई करण्यात आली.
कारवाई करण्याबाबत महापौर नितीन पाटील यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानंतर महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी संबंधित विभागास आदेश दिले. त्यानुसार आज ही तोडक कारवाई करण्यात आली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, उपायुक्त रविकिरण घोडके, सहायक आयुक्त डॉ. रुपाली माने, अनधिकृत बांधकाम विभागाचे प्रमुख अमर पाटील तसेच पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
या इमारतीच्या बांधकामास मंजुरी असलेल्या ११ मजल्यांच्या आराखड्याच्या व्यतिरिक्त १२ वा, १३ वा, १४ वा आणि १५ असे चार मजले विनापरवानगी बांधण्यात आल्याचे महानगरपालिकेच्या निदर्शनास आले होते.
यासंदर्भात संबंधित बांधकामधारकास नोटिसा बजावल्या होत्या. तसेच बांधकाम तत्काळ थांबविण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या, परंतु नोटीसांना न जुमानता बांधकाम सुरू ठेवले होते. संबंधित प्रकरणी सुनावणी घेऊन अनधिकृत बांधकाम स्वतः:हून निष्कासित करण्याचे आदेशही देण्यात आले होते.
कारवाई सुरूच राहणार
मंजूर बांधकाम आराखड्याच्या विरोधात व अधिक करण्यात येणाऱ्या बांधकामांविरोधात महानगरपालिका नियमानुसार कारवाई करत आहे. अशा अनधिकृत बांधकामांना कोणत्याही प्रकारे संरक्षण दिले जाणार नाही, अशी भूमिका महानगरपालिका प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.