पनवेल (प्रतिनिधी विक्रम बाबर) : सिडकोच्या कामोठे परिसरातील मौल्यवान भूखंड बळकावण्यासाठी मृत भावाला ‘जिवंत’ दाखवत बनावट कागदपत्रांची रांगोळी उभी केल्याचा धक्कादायक प्रकार कामोठेमध्ये उघडकीस आला आहे. या उघड झालेल्या गैरकारभारात पनवेल नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सुनील गोविंद बहिरा आणि त्यांची पत्नी श्वेता बहिरा यांच्यासह एकूण 12 जणांवर फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार करण्याचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 2023 मध्ये दैनिक पुढारीने हा सर्व प्रकार उघडकीस आणला होता.
सिडकोच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करताच ही धक्कादायक फसवणूक प्रकाशात आली. तपासात असे समोर आले की, विष्णू गोविंद बहिरा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागेच्या मोबदल्यात सिडकोकडून मिळणारा भूखंड मिळवण्यासाठी बहिरा कुटुंबाने संगनमताने मृत व्यक्तीच्या ओळखीचा “नवा अवतार” निर्माण केला.
मृत विष्णू बहिरा यांचे नाव कायम ठेवून त्यांचा फोटो मात्र सखाराम ढवळे यांचा लावण्यात आला. ढवळे यांना दस्तऐवजांमध्ये विष्णू बहिरा म्हणून सादर करण्यात आले आणि त्यांच्याकडून स्वाक्षऱ्या करून घेत सरकारी कागदोपत्री व्यवहार करण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.
सिडकोच्या सहाय्यक विकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार, २००६ पासून तहसील, दुयम निबंधक आणि सिडकोच्या कार्यालयात या बनावट कागदपत्रांचा सातत्याने वापर करण्यात आला. भाडेपट्टा आणि त्रिपक्षीय कराराच्या वेळीही ढवळे हे ‘जिवंत’ विष्णू बहिरा म्हणून उपस्थित होते. वारसांना सर्व माहिती असूनही त्यांनी या संपूर्ण कटात सक्रिय सहभाग घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या फसवणूक कारवाईच्या जोरावर कामोठे सेक्टर ३५ मधील सुमारे ११०० चौ.मी.चा मौल्यवान भूखंड बहिरा कुटुंबाच्या नावे करून घेण्यात आल्याचे निष्पन्न झाले. शासन तसेच सिडकोची दिशाभूल करत सरकारी मालमत्तेचा गैरवापर केल्यामुळे पुढील पुराव्यांवर आधारित कारवाई करण्यात येत आहे.
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीएनएस कायद्यांतर्गत कठोर कलमे लावत गुन्हा नोंदविण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र घेवडेकर पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणामागे आणखी गुंतागुंतीचे धागेदोरे उलगडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.