Kamothe fire incident 
रायगड

Kamothe Fire Incident| कामोठ्यात कचऱ्याला भीषण आग; दोन अग्निशमन गाड्यांच्या मदतीने नियंत्रण

Kamothe Fire Incident| कामोठ्यात वारंवार घडणाऱ्या अशा घटना लक्षात घेता, पालिकेच्या कचरा व्यवस्थापनावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

पनवेल – विक्रम बाबर, प्रतिनिधी

कामोठे शहरात बुधवारी सकाळच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. मानसरोवर रेल्वे स्थानकाजवळील मोकळ्या मैदानात टाकलेल्या पालिकेच्या कचऱ्याला अचानक भीषण आग लागली, आणि काही क्षणांतच काळ्या धुराचे प्रचंड लोट संपूर्ण परिसरात पसरले. अचानक उठलेल्या या धुरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. ही जागा अनेक दिवसांपासून पनवेल महानगरपालिकेच्या वृक्ष विभाग आणि घंटागाडी कर्मचाऱ्यांनी टाकलेल्या कचऱ्याने भरलेली होती.

परिसरातील नागरिकांनी याबाबत अनेकदा तक्रारीही केल्या होत्या. मात्र तो कचरा हटवला गेला नव्हता. आज सकाळी अचानक झालेल्या आगीमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक विकास घरत यांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधला. काही मिनिटांतच पनवेल महानगरपालिकेच्या दोन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

जवानांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले, पण कचरा, सुक्या फांद्या आणि झुडुपांमुळे ज्वाळांनी काही क्षणांतच उग्र रूप धारण केले. पहिल्या अग्निशमन गाडीतील पाणी फक्त 15–20 मिनिटांत संपले. त्यानंतर दुसऱ्या गाडीतून पाणी भरत गाड्यांचे दोन्ही पथक एकत्र कामाला लागले. जवळपास तासाभराच्या प्रयत्नांनंतरच आग आटोक्यात आली. शेवटी दोन्ही पथकांनी अथक प्रयत्न करत आग पूर्णपणे विझवण्यात यश मिळवले.

या आगीत दोन झाडांचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. सुदैवाने आसपास कोणतीही घरे नसल्याने आणि लोकांची वर्दळ कमी असल्याने जीवितहानी टळली. परंतु या घटनेनंतर राजकीय आणि स्थानिक स्तरावर पुन्हा एकदा पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी नगरसेवक विकास घरत यांनी पालिकेच्या निष्काळजी कारभारावर संताप व्यक्त केला. ते म्हणाले,
“मोकळ्या मैदानात नियमितपणे कचरा, वृक्षछाटणीचा माल आणि सुक्या फांद्या टाकल्या जातात. असे कचऱ्याचे ढिग साचल्यामुळे अशा दुर्घटना घडत आहेत. जबाबदार कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे.”

नागरिकांनीही यावर नाराजी व्यक्त करत सांगितले की, पालिकेचे कर्मचारी नियत ठिकाणाऐवजी मोकळ्या जागेत कचरा टाकतात, त्यामुळे परिसरात घाण पसरतेच, पण आगीसारख्या धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागते. आजची आग हे त्याचेच उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

घटनेनंतर अग्निशमन दलाने परिसरातील कचरा, झुडुपे व ज्वलनशील साहित्य तातडीने हटवण्याची सूचना दिली. तसेच भविष्यात अशी घटना टाळण्यासाठी या जागेवर पहारा किंवा CCTV लावण्याचा सल्लाही दिला आहे.

कामोठ्यात वारंवार घडणाऱ्या अशा घटना लक्षात घेता, पालिकेच्या कचरा व्यवस्थापनावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शहरात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वृक्षछाटणी आणि कचरा संकलनामुळे ही समस्या वाढत चालली आहे. नागरिकांनी यावर योग्य ती कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT