Panvel crime news
पनवेल: विक्रम बाबर
बस पकडण्यासाठी गर्दीतून चढणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारण्याची एकच पद्धत वापरत अज्ञात चोरट्यांनी दोन दिवसांत दोन प्रवाशांचे तब्बल ८४ हजार रुपये लंपास केल्याची घटना कामोठे पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. एका घटनेत ४९ हजारांची रोकड, तर दुसऱ्या घटनेत ३५ हजार रुपये किमतीचा आयफोन चोरीला गेला आहे. या दोन्ही घटनांमुळे बसस्टॉप परिसरात पाकीटमार टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त होत असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पहिल्या घटनेत संजय रामचंद्र जाधव (वय ४२) हे फॅब्रिकेशनचे काम करतात. त्यांनी सकाळी कोपरखैरणे येथील सारस्वत बँकेतून ४९ हजार रुपये काढले होते. कामानिमित्त कळंबोलीतील भिमा कॉम्प्लेक्स येथे जाऊन ते परत तुर्भेला जाण्यासाठी निघाले. कळंबोली सर्कलमार्गे एमजीएम रुग्णालयासमोरील बसस्टॉपवर आल्यानंतर ते बस क्रमांक सी-५३ मध्ये चढत होते.
बसच्या गर्दीत मागून दोन अनोळखी व्यक्ती चढत असताना आपल्या जीन्सच्या उजव्या खिशातून कोणीतरी काहीतरी काढल्याचे जाधव यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ खिशाची तपासणी केली असता ५०० रुपयांच्या ९८ नोटा असलेली ४९ हजार रुपयांची रोकड गायब असल्याचे आढळले. त्यांनी बस थांबवून कंडक्टरला माहिती दिली. मागून चढलेल्या एका व्यक्तीची बॅग तपासण्यात आली; मात्र रोकड सापडली नाही. त्यानंतर दोन्ही संशयितांचा शोध घेण्यात आला, मात्र ते आढळून आले नाहीत.
दुसरी घटना दुपारी कळंबोली कॉलनी-कामोठे बसस्टॉप परिसरात घडली. आयटी कंपनीत कार्यरत असलेले विकास नारायण घोरपडे (वय ३८) हे कामावर जाण्यासाठी बस क्रमांक २४ मध्ये चढत होते. त्यावेळी त्यांनी अॅपल कंपनीचा आयफोन १३ पॅन्टच्या डाव्या खिशात ठेवला होता. बसमध्ये चढल्यानंतर काही क्षणांत खिशाची तपासणी केली असता मोबाईल गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घोरपडे यांनी बसमधील प्रवाशांकडे तसेच परिसरात चौकशी केली; मात्र मोबाईलचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. चोरी झालेल्या मोबाईलची किंमत सुमारे ३५ हजार रुपये असून, त्याचे आयएमईआय क्रमांक पोलिसांना देण्यात आले आहेत.
दोन्ही घटनांमध्ये विशेष बाब म्हणजे बस पकडण्यासाठी प्रवासी चढत असतानाच त्यांच्या खिशातील मौल्यवान वस्तू लंपास करण्याची एकसारखी पद्धत वापरण्यात आली आहे. त्यामुळे बसस्टॉप व बसच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवाशांवर पाळत ठेवून गर्दीचा फायदा घेत चोरटे डल्ला मारतात. कामोठे पोलिस या दोन्ही घटनांचा तपास करीत आहेत. दरम्यान, बसमध्ये चढताना मोबाईल, रोख रक्कम, पाकीट आदी वस्तू सांभाळताना प्रवाशांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.