Raigad Kamothe Fire
पनवेल: विक्रम बाबर
कामोठे येथील सेक्टर ३६ मधील ‘आंबे श्रद्धा सहकारी गृहनिर्माण सोसायटी’त आज सकाळी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात ज्वाळा भडकल्या, ज्यात दोघे होरपळून मृत्यूमुखी पडल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळच्या सुमारास घरात अचानक धुराचे लोट बाहेर येताना दिसल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही क्षणातच आग प्रचंड भडकली आणि संपूर्ण मजल्यावर धुराचे साम्राज्य पसरले. तात्काळ इतर रहिवाशांनी धावपळ करत सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढले. सोसायटीतील संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पाणी टँकरच्या सहाय्याने आग विझविण्याचे काम सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन रहिवासी होरपळल्याची माहिती मिळाली असून, त्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.