Panvel civic development pudhari photo
रायगड

Panvel civic development : कामोठ्यात १५ एमएलडी क्षमतेचे मलउदंचन केंद्र उभारणीला मंजुरी

कामोठ्यातील सांडपाणी व्यवस्थापन अधिक सक्षम होण्याचा मार्ग मोकळा

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : कामोठे परिसरातील सांडपाणी व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सेक्टर-२६ येथील प्लॉट क्रमांक ३ ए येथे १५ एमएलडी क्षमतेचे नवीन मलउदंचन केंद्र (SPH) उभारण्याच्या कामाला पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. केंद्र उभारल्यानंतर पुढील पाच वर्षे त्याचे परिचलन, निगा व दुरुस्ती करण्याच्या कामासाठी न्यूनतम दराची निविदाही मंजूर करण्यात आली. त्यामुळे कामोठ्यातील सांडपाणी व्यवस्थापन अधिक सक्षम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी (दि. १०) महापालिका मुख्यालयात सभापती बबन मुकादम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत विविध विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, उद्याने तसेच पावसाळी पाण्याच्या उपशासह सुरक्षेशी संबंधित अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली.

महापालिका हद्दीतील कामोठे सेक्टर-२६ मध्ये १५ एमएलडी क्षमतेचे नवीन मलउदंचन केंद्र उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी दुसऱ्यांदा मागविण्यात आलेल्या निविदेत न्यूनतम दराची निविदा मंजूर करण्यात आली. केंद्राच्या उभारणीनंतर त्याचे पाच वर्षे परिचलन, देखभाल आणि दुरुस्ती करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय महापालिकेसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या ७३ सुरक्षा कर्मचाऱ्यांना ११ महिन्यांची मुदतवाढ देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. महापालिका क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याच्या टँकर पुरवठ्यासाठी तीन वर्षांच्या कालावधीतील वाढीव खर्चासही मंजुरी देण्यात आली.

कळंबोली प्रभाग समिती 'ब' अंतर्गत श्रीराम मंदिरापासून श्री अपार्टमेंट, प्लॉट क्रमांक ५, सेक्टर-१ पर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण तसेच गटार बांधकाम करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. प्रभाग समिती 'अ', 'ब', 'क' व 'ड' क्षेत्रातील विविध उद्यानांमध्ये डेकोरेटिव्ह पथदिवे उभारून ते कार्यान्वित करण्याच्या कामालाही मंजुरी देण्यात आली.

महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी दोन वर्षांच्या कालावधीसाठी पावसाळी पाण्याचा उपसा करण्याकरिता भाडेतत्त्वावर पंप पुरवठा करून त्याचे परिचलन करण्यासाठी न्यूनतम दराची निविदा मंजूर करण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी गणेश विसर्जन घाटांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT