पनवेल : कळंबोली सर्कलवरील बहुस्तरीय उड्डाणपूलाच्या कामाला वेग आला आहे. 2026 अखेर सिग्नल-विरहित प्रवासाची तयारी करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण 7 उड्डाणपूल, 2 उपसरणे आणि 45 जोडमार्ग उभारण्याचे नियोजन आहे. त्यापैकी काही उड्डाणपूलांसाठी पाया, पाइलिंग आणि गार्डर बसविण्याची कामे सुरु आहे.
नवी मुंबई वाहतूक व्यवस्थेचा सर्वात मोठा बदल घडवून आणणारा कळंबोली सर्कल उड्डाणपूल व इंटरचेंज प्रकल्प वेगाने सुरू आहे. सियॉनपनवेल महामार्ग, मुंबईपुणे एक्सप्रेसवे आणि एनएच-48 या तिन्ही महत्वपूर्ण मार्गांचा संगम असलेल्या या सर्कलवर दररोज हजारो वाहनांची वर्दळ होत असल्याने गेल्या काही वर्षांपासून कोंडी, अपघात व प्रवासातील विलंब वाढला होता. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी हा बहुस्तरीय प्रकल्प हाती घेतला आहे.
प्रकल्पांतर्गत एकूण 7 उड्डाणपूल, 2 उपसरणे आणि 45 जोडमार्ग उभारण्याचे नियोजन आहे. त्यापैकी काही उड्डाणपूलांसाठी पाया, पाइलिंग आणि गार्डर बसविण्याची कामे सुरु असून सेवा रस्त्यांचे रुंदीकरण, नवीन वळणमार्ग आणि बांधकाम क्षेत्राभोवती सुरक्षात्मक बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. वाहतूक व्यवस्थापनासाठी पनवेल एग्झिट तात्पुरते बंद ठेवण्यात आले असून, काही मार्गांवर तात्पुरते सिग्नल व बसविण्यात आले आहेत.
कामाच्या पहिल्या टप्प्यात निर्माण झालेली कोंडी लक्षात घेऊन वाहतूक पोलीसांनी पिक अवरमध्ये अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहेत. पर्यावरणीय बाबींना प्राधान्य देत प्रकल्प क्षेत्रातील झाडांचा मोठ्या प्रमाणावर स्थानांतर कार्यक्रम राबवला जात आहे. रोड कॉरिडॉर स्वच्छ ठेवण्यासाठी धूळ नियंत्रण, बांधकाम कचऱ्याचे व्यवस्थापन आणि जलवाहिन्यांची सुधारणा करण्यात आली आहे. नागरिक व वाहनचालकांसाठी पर्यायी मार्गांची माहिती देणारे दिशादर्शक फलक बसवून अपघाताचा धोका कमी करण्यावर भर देण्यात आला आहे.
काम पूर्ण झाल्यानंतर कळंबोली सर्कल सिग्नल-विरहित इंटरचेंज स्वरूपात कार्यरत होणार असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी पोर्ट आणि औद्योगिक क्षेत्रांशी जोडणी मोठ्या प्रमाणात सुलभ होईल. परिणामी, स्थानिक वाहतूक, भारी वाहतूक आणि विमानतळाकडे जाणारी वाहतूक हे तीन प्रवाह स्वतंत्रपणे वाहतील. यामुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन शहरातील व्यावसायिक व औद्योगिक गतिशीलता वाढेल, असा तज्ज्ञांचा विश्वास आहे.
सुरक्षा नियमांचे पालन
महापालिका व प्रकल्प व्यवस्थापन संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य संरचनांचे काम 2025-26 मध्ये टप्प्याटप्प्याने पूर्ण होईल आणि पूर्ण प्रकल्प 2026 अखेरीपर्यंत कार्यान्वित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी येत्या काळात प्रशासनाने सुचवलेले पर्यायी मार्ग वापरावेत आणि सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.