Kalamboli Circle Flyover pudhari photo
रायगड

Kalamboli Circle Flyover : कळंबोली सर्कल येथे उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर

मुंबई, पुणे, जेएनपीए, विमानतळाचा प्रवास होणार सुसाट; मुंबई-गोवा महामार्गाला जोडणारा महत्त्वाकांक्षी पूल

पुढारी वृत्तसेवा

खांदा कॉलनी : पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या कळंबोली सर्कल येथील उड्डाणपुलाच्या कामाने आता वेग घेतला आहे. या पुलाचे बांधकाम सध्या जोरदार सुरू असून, विविध यंत्रसामग्रीच्या साहाय्याने काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हा उड्डाणपूल जेएनपीटी मार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई-गोवा महामार्गाला जोडणाऱ्या वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील उड्डाणपुलाच्या वरून या नव्या पुलाची जोडणी होणार असल्याने कळंबोली परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल अपेक्षित आहे.

कळंबोली सर्कल हे मुंबई, पुणे, ठाणे, पनवेल, जेएनपीए आणि गोवा दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. दररोज हजारो अवजड कंटेनर, ट्रक, खासगी वाहने, एसटी बस आणि प्रवासी वाहनांची या मार्गावरून ये-जा सुरू असते. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई-गोवा महामार्ग, जेएनपीटी मार्ग आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनांचा ताण या परिसरावर मोठ्या प्रमाणात पडतो. त्यामुळे गर्दीच्या वेळेत कळंबोली सर्कल येथे वाहनांच्या रांगा लागतात.

बांधकामामुळे वाहनचालकांचे लक्ष या प्रकल्पाच्या पूर्णत्वाकडे लागले आहे. कामाचा वेग असाच कायम ठेवून सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करत हा पूल लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर कळंबोली सर्कलमधील वर्षानुवर्षांची वाहतूक कोंडी कमी होऊन मुंबई, पुणे, जेएनपीए, विमानतळ आणि कोकणाकडे जाणारा प्रवास अधिक सुलभ होईल, अशी आशा पनवेलकरांना आहे.

अनेक महत्त्वाचे मार्ग एकमेकांना जोडणार

नव्या उड्डाणपुलामुळे विविध महामार्ग आणि महत्त्वाच्या वाहतूक मार्गांना अधिक सुलभ जोडणी मिळण्याची अपेक्षा आहे. जेएनपीए बंदराकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना तसेच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना याचा फायदा होणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील पुलाच्या वरून होणारी ही जोडणी कळंबोलीतील वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जाते.

वाहतूककोंडी फुटणार; प्रवासाचा वेळ वाचणार

कळंबोली सर्कल येथे विविध दिशांनी येणाऱ्या वाहनांना एकाच वाहतूक व्यवस्थेतून मार्ग काढावा लागतो. त्यामुळे काही किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठीही वाहनचालकांना बराच वेळ खर्च करावा लागतो. मात्र, नव्या उड्डाणपुलामुळे वाहनांना अधिक थेट आणि सुलभ मार्ग उपलब्ध झाल्यास सर्कलवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. विशेषतः विमानतळावर जाणारे प्रवासी, जेएनपीए बंदरातील कंटेनर वाहतूक आणि मुंबई-गोवा मार्गावरील प्रवाशांना वेळेत इच्छित स्थळी पोहोचणे शक्य होईल.

विकासाला मिळणार गती

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर पनवेल, कळंबोली आणि परिसरातील वाहतुकीचे महत्त्व आणखी वाढणार आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या, बंदरातील अवजड वाहनांची वर्दळ आणि महामार्गांवरील वाढती वाहतूक लक्षात घेता अशा जोडरस्त्यांची आवश्यकता अधिक महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे कळंबोली सर्कल येथील हा उड्डाणपूल भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा दुवा ठरण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT