गतिक बँकेच्या सीपीपीआय निर्देशांकात जेएनपीएचा डंका pudhari photo
रायगड

JNPA CPPI Ranking : जागतिक बँकेच्या सीपीपीआय निर्देशांकात जेएनपीएचा डंका

देशातील सर्वोत्तम बंदर म्हणून अव्वल स्थान कायम

पुढारी वृत्तसेवा

उरण : भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (जेएनपीए) देशातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर म्हणून आपले अव्वल स्थान यशस्वीरित्या कायम राखले आहे. जागतिक बँक आणि एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स यांच्या वतीने संयुक्तपणे प्रकाशित करण्यात आलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या 'कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स २०२५' (सीपीपीआय) मध्ये जेएनपीएने जागतिक स्तरावर २२वा क्रमांक पटकावत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

गुणतालिकेतील उत्कृष्ट कामगिरी आणि जागतिक सुधारणा

सीपीपीआय २०२५ च्या ताज्या अहवालानुसार, जेएनपीएने बंदराच्या एकूण कार्यकालापैकी तब्बल ७५ टक्के बर्थ ऑक्युपन्सी शेअरची नोंद केली आहे. या निर्देशांकात बंदराने स्टॅटिस्टिकल इंडेक्समध्ये ५८.९ आणि प्रशासकीय इंडेक्समध्ये १३८.० गुण मिळवून जागतिक कंटेनर बंदरांच्या स्पर्धेत आपले महत्त्वपूर्ण स्थान अधोरेखित केले आहे.

विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांत म्हणजेच २०२० ते २०२५ या कालावधीत कामगिरीत सर्वाधिक सुधारणा करणाऱ्या जगातील अव्वल २० बंदरांमध्ये जेएनपीएने १४वे स्थान मिळवले आहे. या पाच वर्षांच्या प्रवासात जेएनपीएच्या क्रमवारी गुणांकनात ३२ गुणांची लक्षणीय वाढ झाली असून, २०२० मधील ६६ गुणांवरून २०२५ मध्ये हा स्कोअर ९८ गुणांपर्यंत पोहोचला आहे.

असे ठरते बंदरांचे जागतिक मूल्यमापन

कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्समध्ये जगभरातील बंदरांच्या कामगिरीचे मूल्यमापन हे प्रामुख्याने जहाजांनी बंदरात घालविलेल्या प्रत्यक्ष वेळेच्या आधारे केले जाते. हे मूल्यांकन अचूक करण्यासाठी ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम (एआयएस) आधारित पोर्ट कॉल रेकॉर्ड्स आणि टर्मिनल्सकडील खाजगी (प्रोपायटरी) डेटाचा आधार घेतला जातो.

यामध्ये प्रामुख्याने जहाजाचा अरायव्हल टाइम (आगमनाची वेळ), बर्थ टाइम (धक्क्याला लागण्याची वेळ) आणि डिपार्चर टाइम (निघण्याची वेळ) या तीन प्रमुख घटकांचा अभ्यास करून अंतिम सीपीपीआय स्कोअर निश्चित केला जातो. या निकषांवर उतरत देशात सर्वोत्तम ठरलेले जेएनपीए बंदर यापुढेही क्षमता विस्तार, ऑपरेशनल उत्कृष्टता, शाश्वत विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत देशाच्या आर्थिक विकासाला अधिक गती देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

क्षमता विस्तार आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित : जेएनपीए अध्यक्ष गौरव दयाल

भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर म्हणून जेएनपीएला मिळालेली ही मान्यता म्हणजे बंदराची कार्यक्षमता वाढवणे, जहाजांच्या टर्नअराउंड वेळेत (बंदरात येण्या-जाण्याच्या वेळेत) सुधारणा करणे आणि बंदराधारित लॉजिस्टिक्स अधिक सक्षम करण्यासाठी संपूर्ण टीमने सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे यश असल्याचे जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाल यांनी सांगितले. हा सन्मान संपूर्ण पोर्ट समुदायासाठी अभिमानास्पद असून, जागतिक स्तरावरील सर्वोत्तम बंदरांच्या बरोबरीने स्वतःचे मूल्यमापन करत कामगिरी अधिक उंचावण्याची जबाबदारी यामुळे वाढल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांनी सर्व टर्मिनल ऑपरेटर्स, शिपिंग लाईन्स, लॉजिस्टिक्स भागीदार, सीमाशुल्क विभाग आणि सर्व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT